देशातील प्रत्येक गावाचे प्रतिबिंब अमृत वाटीकेत दिसेल -पालकमंत्री दादाजी भुसे

0 5

नाशिक, दि. २१ (जिमाका): देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जण आपल्या प्राणांची आहुती देऊन शहीद झाले. त्यांच्या स्मृती, पराक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरावा, यासाठी दिल्ली येथे अमृत वाटीकेची निर्मिती करण्यात येणार आहे. या अमृत वाटीकेत देशातील प्रत्येक गावांमधून अमृत कलशांच्या माध्यमातून माती नेण्यात येणार असल्याने या वाटीकेत देशातील प्रत्येक गावाचे प्रतिबिंब दिसणार आहे, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

कालिदास कलामंदिर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यात ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या अमृत कलश यात्रा कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, जिल्ह्यातील एक हजार ९२६ गावांची माती या अमृत कलशांमार्फत दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या अमृत वाटीकेत मिसळली जाणार आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हे अभियान गाव पातळीवर अतिशय उत्साहाने साजरे करून तालुकास्तरावरून आणलेले हे अमृत कलश जिल्ह्यामार्फत येत्या काही दिवसांत दिल्लीला जाणार आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शहीदांच्या स्मृतींना स्मरण करण्यासाठी सुरू असलेली ही अमृत कलश यात्रा जिल्हावासियांच्या सहभागाने यशस्वी झाली आहे. यासोबतच केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या विश्वकर्मा योजना तसेच आरोग्य विभागाच्या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या गोल्डन कार्डचा देखील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक असलेल्या साहित्याबाबत २६ ऑक्टोबर रोजी आयोजित शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी केले.

तेज, त्याग, तप, तत्व व तर्क यांचे प्रतिक म्हणजे अमृत कलश यात्रा केंद्रीय राज्यमंत्री : डॉ. भारती पवार

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथे साकरल्या जाणाऱ्या अमृत वाटीकेमध्ये सर्व देशवासियांचा सहभाग असावा या भावनेतून माझी माती माझा देश हे अभियान संपूर्ण देशात राबविले जात आहे. या अभियानाला नागरिकांचा मिळलेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येकाला ऊर्जा देणारा आहे. कलशांमध्ये असलेली ही फक्त माती नसून स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांची गाथा सांगणारा इतिहास या मातीत आहे. त्यामुळे संपूर्ण देशपातळीवर सुरू असणारी ही अमृत कलश यात्रा म्हणजे तेज, त्याग, तप, तत्व व तर्क यांचे प्रतिक आहे. असे सांगत असतांना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी केंद्र सरकारमार्फत सामान्य नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना सर्वांच्या सहभागाने यशस्वी होत असल्याचेही सांगितले. तसेच अमृत कलश यात्रा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचे देखील यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी कौतुक केले.

शहीदांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी अमृत वाटीका : मंत्री छगन भुजबळ

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत माझी माती माझा देश अभियानाच्या माध्यमातून देशाच्या मातीसाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या स्मृती कायम जागरूक ठेवण्यासाठी दिल्लीत अमृत वाटीका तयार करण्यात येणार आहे. यासाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील माती असणारे हे कलश आपल्या देशभक्तीचे प्रतिक आहेत. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मनात देशाप्रती असणारा स्वाभिमान हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. देशाप्रती असलेल्या स्वाभिमानातूनच सर्वांच्या सहभागाने सुराज्य निर्माण होण्यास मदत होणार आहे. यासाठी देशासाठी काम करण्याची भावना सातत्याने मनात असणे आवश्यक असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला अमृत कलश यात्रेत उत्कृष्ट काम करणाऱ्या सुरगाणा, कळवण व नाशिक तालुक्यांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणलेल्या अमृत कलशांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कलशांची कालिदास कलामंदिरापासून जिल्हा परिषदेपर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.