जिल्हा क्रीडा संकुलात सुविधांसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा व खेळाडुंसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यासंदर्भात आवश्यक निधीचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा. निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.
जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व राजेसाहेब लोंढे आदि उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलमधे करण्यात येणाऱ्या विविध कामांबाबत चर्चा करून त्यास मान्यता देण्यात आली. क्रीडा संकुलात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडु निर्माण व्हावेत, यासाठी करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या.
या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल येथे 400 मीटर सिंथेटिक धावण मार्ग, बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव दुरुस्ती, कबड्डी व खो-खोसाठी डोम, अद्ययावत व्यायामशाळा, खो-खो, व्हॉलिबॉल या खेळाची मैदाने, क्रीडा साहित्य खरेदी, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे आदिंसह अन्य कामांवर चर्चा करण्यात आली.
000