आरसेटी संस्थेतून महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण

0 4

एक स्री खूप चांगली व्यवस्थापक असते. एका वेळी ती अनेक गोष्टींचे व्यवस्थापन करत असते. ज्यांना स्वावलंबी व्हायची आस आहे, त्यांच्यासाठी आर सेटी खास आहे. कारण ग्रामीण भागातील महिला आत्मनिर्भर बनाव्यात,  त्यांची स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने बँक ऑफ इंडियाच्यावतीने स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण  संस्थेच्या (RSETI) वतीने मातृभाषेतून व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. या आर सेटीमधून प्रशिक्षण घेऊन कित्येक महिलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर सेटी ही 2010 साली स्थापन झाली आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत व त्या जिल्ह्यातील अग्रणी बँकेद्वारे संचलित एक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्यांचे वय वर्ष १८ ते ४५ आहे आणि ज्यांना मातृभाषेचे ज्ञान आहे, अशा ग्रामीण भागातील व्यक्तिंना प्रायोजित प्रशिक्षण दिले जाते. संस्थेमधून दिली जाणारी प्रशिक्षणे ही निवासी व मोफत स्वरूपाची असतात. प्रशिक्षणा दरम्यान चहा, नाष्टा, जेवण, निवासाची सोय, प्रात्यक्षिकसाठी लागणारे सर्व साहित्य हे सर्व मोफत पुरवले जाते.

प्रशिक्षणार्थींची निवड करताना प्रथम संस्थेकडील प्रशिक्षण अभ्यासक्रमांची जनजागृती करुन प्रशिक्षणार्थींची निवड मुलखतीद्वारे केली जाते. यासाठी प्रशिक्षणार्थींना आवश्यक कागदपत्रके, दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म तारखेचा कागदोपत्री पुरावा, 2 पासपोर्ट साईज फोटो, दारिद्र्यरेषेखाली असल्यास त्याचा कागदोपत्री पुरावा इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात.

अशा प्रकारच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमामधून प्रशिक्षण घेऊन महिला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. या संस्थेमार्फत दिली जाणारी प्रशिक्षणे ही उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी अल्पकालीन प्रशिक्षण व दीर्घकालिन स्वावलंबन असतात.

संस्थेमध्ये महिला वर्गासाठी काही विशेष प्रशिक्षणे आहेत. कुक्कुटपालन, खेळणी बनवणे, अगरबत्ती तयार करणे, फास्ट फूड उद्यमी, महिलांसाठी वस्त्रलंकार रचना, पापड लोणचे मसाला पावडर तयार करणे, कागदी पिशव्या लखोटे व फाईल तयार करणे, मधमाशी पालन, कॉस्च्युम ज्वेलरी उद्यमी, जूट बॅग उद्यमी, बांबू हस्तकलाकुसर, ब्युटीपार्लर मॅनेजमेंट, रेशीम कोश उत्पादन, दुग्धव्ययसाय गांडूळ शेती, भाजीपाला रोपवाटिका शेती, व्यायसायिक फूलशेती इत्यादी प्रशिक्षणे संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. या प्रशिक्षणामध्ये काही प्रशिक्षणे ही 10 दिवसांची तर काही प्रशिक्षणे 30 दिवसांची तसेच अल्पकालिन प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमातून परिपूर्ण व्यावसायिक ज्ञान व प्रात्यक्षिके, बाजारपेठ निरीक्षण व व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास, विविध खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून आत्मविश्वासामध्ये वाढ, विविध शासकीय योजना व प्रकल्प अहवालविषयक माहिती दिली जाते. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी मदत केली जाते.

प्रशिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून सप्टेंबर २०२३ अखेर २४४ प्रशिक्षण कार्यक्रम घेतले असून त्यातून ६ हजार, ८५४ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये ५ हजार ७९९ इतक्या महिला आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमातून ५ हजार, १०६ इतकी स्वयंरोजगार निर्मिती झाली असून यामध्ये महिलांचा समावेश ४ हजार, २९१ इतका आहे.

 ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत व बँक ऑफ इंडिया सांगली संचलित स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे (RSETI) हे प्रशिक्षण केंद्र, डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालयच्या पाठीमागे, रमा उद्यान शेजारी मिरज, (०२३३-२९९००३७) येथे कार्यरत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत RSETI संस्थेस भेट द्यावी. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयोग यशस्वी होत आहेत.

 संकलन

जिल्हा माहिती कार्यालय,

सांगली

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.