‘माझी माती, माझा देश’ उपक्रमातून देशाप्रति, आपल्या मातीविषयी कृतज्ञता – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद

0 3

सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : ‘माझी माती, माझा देश’ उपक्रम मिट्टी को नमन, वीरो को वंदन करणारा असून, देशाप्रति, मायभूमीच्या मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. यातून एकात्मतेचे मूल्य जपले जाईल. आपण सर्वांनी देशाप्रति आपली एकनिष्ठता जपायची आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेच्या जिल्हास्तरीय सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील,  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरीक्त जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, नगर प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत देशभरात अनेक उपक्रम राबविले गेले. त्यातील एक उपक्रम ‘माझी माती, माझा देश’ असल्याचे सांगून डॉ. सुरेश खाडे म्हणाले, या उपक्रमांतर्गत शिलाफलकम, पंच प्रण शपथ, वसुधा वंदन, वीरांना वंदन आदी कार्यक्रम घेण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्याच्या नावांचे फलक, स्तंभ उभारण्यात आले. या माध्यमातून वीर योध्दांच्या समर्पणाचे स्मरण करण्यात आले. माणसं आपल्या मातीशी जोडली गेली पाहिजेत. गावाप्रती, देशाप्रति आणि आपल्या मातीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावायला हवे, असे ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी गोरगरीबांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. साहसी मर्दानी खेळ सादर केल्याबद्दल त्यांनी लोहशाहीर अण्णाभाऊ साठे लेझीम दांडपट्टा मंडळाचे अभिनंदन केले.

खासदार संजय पाटील म्हणाले, ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत विविध ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातून संकलित केलेली व आज जिल्हास्तरावर एकत्रित केलेली माती राज्यात आणि तेथून दिल्लीला समारंभपूर्वक नेण्यात येणार आहे. या उपक्रमातून आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यास मदत होणार आहे. स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून त्यांच्या समर्पणापासून प्रेरणा मिळेल. देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा उपक्रम मदतीचा ठरेल, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, प्रत्येक गावातून संकलित केलेली माती तालुकास्तरावरून आज जिल्हा स्तरावर आणण्यात आली आहे. आता राज्य आणि देशस्तरावर ही माती पाठवली जाणार आहे. या पार्श्वभूमिवर देशाच्या प्रगतीत आपण काय योगदान देऊ शकतो, हा विचार आपल्या प्रत्येक कृतीमागे असावा व तशी वर्तणूक असावी, असे ते म्हणाले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात पंचप्रण शपथ, वीरों का वंदन, स्वातंत्र्यसैनिक शिलालेख फलक, वीरांप्रती कृतज्ञता, वसुधा वंदन आदि उपक्रम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आले.

महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी दिवंगत प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची कविता सादर करत देशाप्रति प्रत्येक भारतीयाच्या असणाऱ्या कर्तव्यनिष्ठेचे स्मरण करून दिले. तसेच माझी माती, माझा देश अंतर्गत महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

विविध तालुक्यातून आणलेले अमृत कलश यांचे जिल्हास्तरावर सवाद्य स्वागत करण्यात आले. प्रारंभी पंचप्रण शपथ पठण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने व नबिलाल मुलाणी यांचा तसेच, शहीद जवानांचे, स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार कुटुंबिय, नातेवाईक यांचा सन्मान करण्यात आला. सहायक आयुक्त नगरपालिका शाखा अश्विनी पाटील, खानापूरच्या  नगराध्यक्षा सुमन पाटील, कवठेमहांकाळच्या नगराध्यक्षा सिंधुताई गावडे यांच्यासह सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सर्व गट विकास अधिकारी व जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. उपायुक्त राहुल रोकडे यांनी आभार मानले. वंदे मातरम् व राज्य गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन नाना हलवाई यांनी केले. यावेळी वाटेगावच्या लोहशाहीर अण्णाभाऊ साठे लेझीम दांडपट्टा मंडळाने पारपंरिक मर्दानी खेळ व साहसी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

जिल्हा सहआयुक्त  नगरपालिका प्रशासन शाखा, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि जिल्हा नियोजन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.