आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी सर्वांचा समन्वय महत्त्वाचा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि. 13 : राज्यात येणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कालावधीत आपदग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य यांचा समन्वय ठेवला जातो. याशिवाय लष्कर, नौदल, तटरक्षक दल, राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या समन्वयातून प्रत्येक आपत्तीला आपण खंबीरपणे तोंड देऊ शकतो, हे वारंवार सिद्ध केले आहे, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
मंत्रालय येथे मदत व पुनर्वसन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील बोलत होते.यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ.सोनिया सेठी, आपत्ती व्यवस्थापन संचालक अप्पासाहेब धुळाज, तटरक्षक दलाचे महासंचालक श्री. कौशिक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे कमांडर दीपक तिवारी, नौदलाचे कमांडर अभिषेक कारवानी, अग्निशमन दलाचे संचालक संतोष वारी, उपसचिव संजय धारूरकर, उपसचिव श्रीनिवास कोतवाल आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरदेखील आपत्ती विभागाची जबाबदारी असते. ज्या ठिकाणी आपत्तीचा धोका संभवतो त्या परिसरात तत्काळ संदेश जाणे अत्यंत गरजेचे असते. त्याचबरोबर परिस्थिती पाहून मदत व बचाव कार्यही तत्काळ सुरू करावे लागते. अशावेळी सर्व यंत्रणांचा संवाद असणे गरजेचे असते. यवतमाळ, नागपूर येथे आलेल्या पूर कालावधीमध्ये बचाव यंत्रणांनी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. आपत्कालीन यंत्रणा अत्याधुनिक यंत्रांनी सुसज्ज असल्या पाहिजेत, यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी आग्रही असावे. आपत्कालीन कालावधीमध्ये कोणती खबरदारी घ्यावी, याचे प्रशिक्षण शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना दिले जावे, यासाठी देखील प्रयत्न करण्यात यावेत.
आपत्ती व्यवस्थापनचे संचालक श्री. धुळाज म्हणाले की, राज्यात आपत्तीविषयक विविध प्रशिक्षण घेण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे फोन येत असतात त्यालाही राज्य नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून तत्काळ मदत केली जाते. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत उष्णतेच्या लाटा यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा नुकतीच झाली. आपत्ती पूर्व आणि आपत्तीनंतर कशा प्रकारे काळजी घ्यावी यासाठी क्षमता बांधणी ही काम आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत केले जाते. राज्यात आपत्ती सौम्यीकरणाचे 3200 कोटी रुपयांची कामे देखील सुरू आहेत. प्रत्येक यंत्रणांचा चांगल्या प्रकारे समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग अहोरात्र कार्यरत आहे. आपत्कालीन कालावधीत तत्काळ मदत मिळण्यासाठी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
राज्य मंत्रालय नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वांनी घेतली शपथ
मी प्रतिज्ञा करतो की, शासनाच्या आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेईन. आपत्तीच्या धोक्यापासून मी स्वतःची, माझ्या परिवाराची, समाजाची तसेच सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणेविषयीचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करेन. आपत्तीचे धोके कमी करण्याऱ्या सामुदायिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेईन.
आपत्तीच्या धोक्यापासून सुरक्षिततेसाठी करावयाच्या पूर्वतयारीची माहिती मी जनजागृतीच्या माध्यमातून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव प्रयत्न करीन. राज्यातील आपत्तीप्रवण भागात जीवित, वित्त व पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सदैव कार्यतत्पर राहीन.
शासनाच्या वतीने आपत्ती निवारणार्थ घेण्यात येत असलेल्या सौम्यीकरणाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून संभाव्य धोका कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. युएनडीपीचे राज्य प्रकल्प अधिकारी श्रीदत्त कामत यांनी सूत्रसंचालन केले.
******
संध्या गरवारे/विसंअ/