तळा नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचा सुधारित आराखडा तत्काळ सादर करावा – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई दि १० – तळा (जि.रायगड) नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचा सुधारित आराखडा तत्काळ सादर करावा. नगरपंचायतीतील स्मार्ट अंगणवाडी उभारणीच्या कामास गती देण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.
तळा नगरपंचायतीच्या कामांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी मंत्री कु. तटकरे बोलत होत्या.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, तळा नगरपंचायत कार्यालयाची प्रशासकीय इमारत तीन मजली करावी, वरच्या मजल्यावर विविध उपयोगी सभागृह बांधण्यात यावे, त्याच्या वापरातून नगरपंचायतीला उत्पन्न प्राप्त होईल. या उत्पन्नातून कार्यालयाचा देखभाल खर्च करण्यात यावा. सोलर पॅनल बसविण्यात यावे, पाणीपुरवठ्यासंदर्भात कार्यवाही करावी. इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा तत्काळ सादर करावा. नगरपंचायतीतील स्मार्ट अंगणवाडी सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिल्या.
०००
श्रद्धा मेश्राम/ससं/