महामंडळांच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री संदिपान भुमरे
छत्रपती संभाजीनगर, दि.9(जिमाका) – शासनाने विविध समाजघटकातील गोरगरिबांच्या आर्थिक उन्नती व स्थायी उत्पन्न स्त्रोतासाठी विविध महामंडळांची निर्मिती केली आहे. त्याद्वारे उद्योग व्यवसायासाठी कर्ज रुपाने अर्थसहाय्य दिले जाते. अशा गरजू लोकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवून त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे दिले.
पालकमंत्री श्री. भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध महामंडळांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अर्चना खेतमाळीस, जिल्हा अग्रणी बॅंकेचे केदारे, तसेच विविध महामंडळांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. भुमरे यांनी यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अशा महामंडळांचा आढावा घेतला. लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया, लाभार्थ्यांना देण्यात आलेला लाभ व त्यातून त्यांचे झालेले आर्थिक स्वावलंबन याबाबी अंतर्भूत होत्या. जिल्ह्यात गरजू लोकांपर्यंत या महामंडळांच्या योजना पोहोचवाव्या व जिल्ह्यात विविध समाज घटकांना आर्थिक स्वावलंबी बनवावे,असे त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांना देण्यात आलेले अर्थसहाय्य त्यासाठी केला जाणारा बॅंक व्याज परतावा आदी योजनांचाही लाभ देण्यात यावा. जेणे करुन कर्ज परतफेडीचा दर चांगला राखता येईल, असेही त्यांनी सांगितले.
ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत भूसंपादनाचा आढावा
पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कालव्यांसाठी करावयाच्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेतला.
प्रस्तावित कालव्यासाठी भूसंपादन करावयाची जमीन, त्यासाठी राबवावयाची प्रक्रिया, शेतकऱ्यांना देण्यात आलेला व द्यावयाचा मोबदला या सर्व टप्प्यांचा श्री. भुमरे यांनी आढावा घेतला. यातील खेर्डा व उर्वरीत आठ गावांसाठी फेर भुसंपादन प्रक्रिया राबवावी व त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी निश्चित केला. त्यानुसार ही प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
रब्बीसाठी पाणी वितरणाचे नियोजन करा
पावसाचे प्रमाण कमी असले तरी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये असलेल्या जलसाठ्यातून रब्बी हंगामासाठी पाणी वितरणाचे नियोजन करावे असे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिले.
जिल्ह्यात नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प तसेच अन्य प्रकल्पांकडे पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेल्या मागणीची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील स्थितीचाही यासंदर्भात आढावा घेऊन मागणी नोंदवावी अशी सुचना यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम चांगल्या पद्धतीने घेता यावा यासाठी पाणी वितरणाचे नियोजन संबंधित विभागांनी करावे,असे निर्देश पालकमंत्री भुमरे यांनी दिले.
जिल्ह्यात माथाडी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीची चौकशी करा
जिल्ह्यात अनेक औद्योगिक आस्थापना आहेत. या सर्वच ठिकाणी जेथे माल उतरविणे व चढविणे असे हमालीचे काम केले जाते, असे श्रमाचे काम करणाऱ्या कामगारांना नियमानुसार वेतन व अन्य सुविधा मिळणे अपेक्षित आहे. तरी जिल्ह्यात माथाडी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चौकशी करावी असे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या मध्यान्न भोजन योजना, माथाडी कायद्याप्रमाणे राबवावयाच्या विविध योजना, कामगार कल्याणाचे विविध उपक्रम याबाबत माहिती देण्यात आली. इमारत बांधकाम कामगारांना द्यावयाचे सुरक्षा किट इ. बाबत आढावा घेण्यात आला. याबाबत कामगारांना नोंदित करुन घेण्यासाठी मोहिम राबवावी, तसेच माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याबाबत चौकशी करावी,असे निर्देश पालकमंत्री श्री. भुमरे यांनी दिले.
00000