महाराष्ट्र विधानमंडळ आणि एमआयटीच्या सहकार्याने शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

0 3

पुणे दि. 9:  एमआयटी विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चा विस्तार करीत नागपूर, पुणे आणि मुंबई येथे एमआयटी विद्यापीठाच्या माध्यमातून शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, हा अभ्यासक्रम एमाआयटीच्या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांनाही उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठ येथे ‘मास्टर्स इन पॉलिटीकल लिडरशीप ॲण्ड गव्हर्नमेंट’ या विषयावरील अभ्यासक्रमाच्या 19  व्या बॅचच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षानेते विजय वडेट्टीवार, विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड, आमदार सुनिल टिंगरे, माजी संसद सदस्य सुष्मिता देव, उल्हासदादा पवार,  सचिन सावंत, डॉ. के. गिरीसन आदी  उपस्थित होते.

श्री.नार्वेकर म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळ आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने सहयोगी कार्यक्रम राबवावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना विधानमंडळ सदस्यांसोबत आंतरवासिता करता येईल आणि विधानमंडळ सदस्यांना विद्यापीठात या विषयातील कमी कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होईल. या विद्यार्थ्यांमधून देशाला अभिमान वाटेल असे जागतिक नेतृत्व घडावे अशी अपेक्षा व्यक्त करून  हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसोबत समाजाच्यादृष्टीनेही उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्री.नार्वेकर म्हणाले,  देशाने संसदीय पद्धतीची लोकशाही स्वीकारली आहे. या पद्धतीत त्रुटी असू शकतील, मात्र ही सर्व शासन पद्धतीत उत्तम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांपासून संसद सदस्यांपर्यंत सर्वांवर भविष्यातील आव्हाने ओळखून समाजाला दिशा देण्याची मोठी जबाबदारी आहे. या विषयाचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांनी विशिष्ट दृष्टीकोन बाळगण्याची गरज आहे. आपल्या देशाला जगातील समृद्ध आणि संपन्न देश बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. स्वत:मधील नेतृत्व गुणांचा विकास करूनच समाजात अनुकूल बदल घडवून आणणे शक्य आहे. केवळ चर्चेत असणाऱ्या समस्यांवर लक्ष न देता समाजात अनुकूल बदल घडविण्यासाठी  महत्वाच्या असणाऱ्या मुलभूत समस्यांवर विशेष लक्ष द्यावे लागेल. नागपूर, पुणे आणि मुंबई येथे एमआयटीच्या सहकार्याने शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, येत्या काळात राजकारणात चांगल्या व्यक्तींना महत्व प्राप्त होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पैलूंवर लक्ष द्यावे. भेदावर आधारीत राजकारण न करता जात, पंथ, धर्म विसरून माणसाला माणसाशी जोडणारे राजकारण करावे. संत-महापुरूषांच्या चरित्राचा अभ्यास करण्यासोबत या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी धैर्य आणि सातत्य आवश्यक आहे. नेतृत्वासाठी चांगला वक्ता असणे गरजेचे आहे. अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर आपल्या भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी, देशाला पुढे नेण्यासाठी कार्य केल्यास या विद्यार्थ्यांमधून चांगले नेतृत्व निर्माण होईल.  बलशाली भारताच्या निर्मितीत नव्याने सुरू केलेल्या अभ्यासक्रमाचे चांगले योगदान राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, शारिरीकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्या सचेत, ज्ञानवान आणि आध्यात्मिक जाणिवा असणारा व्यक्ती उत्तम नेता बनू शकतो. केवळ राजकारणात जाण्याने नेतृत्व घडत नाही, तर सकारात्मक विचाराने सामाजिक कार्य करणारा व्यक्तीही चांगला नेता बनू शकतो.  देश आणि जग एक कुटुंब आहे हे जाणून कार्य करणे प्रत्येक नेतृत्वाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.

श्रीमती देव, श्री. सावंत, डॉ. राहुल कराड, डॉ.के.गिरीसन  यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते डॉ.राहुल कराड यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

****

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.