४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

0 13

नागपूर, दि. 19 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता विधानपरिषद सभागृह, विधानभवन, नागपूर येथे उद्घाटन होणार आहे.

या उद्घाटन समारंभास विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचे सह-अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे खजिनदार ॲड. आशिष शेलार, राज्यातील 12 विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित राहणार आहेत.

49 वा संसदीय अभ्यासवर्ग 20 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत विधानभवन, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गात विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बुधवार दि.21 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळात विधेयकांचे महत्त्व व कार्यपद्धती तसेच विधिमंडळाचे विशेषाधिकार’ या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘विविध संसदीय आयुधे, विधिमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत.

गुरुवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘लोकप्रतिनिधी स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धवासाठी युवक चळवळीचे योगदान’ या विषयावर विधानसभा सदस्य कु. प्रणिती शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

शुक्रवार, दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या‍ विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्र, जि.चंद्रपूर येथे अभ्यास भेट आयोजित करण्यात आली आहे.

रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. ‘कार्यपालिका व न्यायपालिका यांच्यातील परस्पर संबंध’ याविषयावर विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 11 वा. ‘भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचना, कार्यपद्धती व कायदा तयार करण्याची प्रक्रिया’ या विषयावर विधानमंडळाचे उपसचिव विलास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत.

सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर दै.सकाळ, नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.

मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘अर्थसंकल्पाची प्रक्रिया : कल्याणकारी राज्यनिर्मितीचे महत्त्वपूर्ण साधन’ या विषयावर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘विधिमंडळ : जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ’ या विषयावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळी 10.35 वा. पीठासीन अधिकारी व मान्यवरांच्या शुभहस्ते सहभागी विद्यार्थी, प्राध्यापकांना प्रशस्तीपत्रांचे वितरण व अभ्यासवर्गाचा समारोप होणार आहे.

या अभ्यासवर्गाचे प्रसारण महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल

यू ट्यूबhttps://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटरhttps://twitter.com/MahaDGIPR

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/19.12.22

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.