राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देताना त्यात गुणवत्ता राखा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

0 2




राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देताना त्यात गुणवत्ता राखा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

मुंबई दि. २८ :- महाराष्ट्राला कृषी, वीज निर्मिती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचे आहे. त्यासाठी विजेशी संबंधित सर्व कंपन्या सुस्थितीत आणाव्या लागतील. भविष्यात त्यात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे लिस्टिंग करण्याबाबत विचार करावा लागेल. ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत कंपन्यांबाबत येणाऱ्या तक्रारी कालमर्यादेत सोडविण्यासाठी जिल्हा, विभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री तथा मंडळाच्या उपाध्यक्ष मेघना बोर्डीकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आभा शुक्ला, संचालक लोकेश चंद्रा, राधाकृष्णन बी., अनुदीप दिघे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, नीता केळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

 







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.