राज्यस्तरीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचे  महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली गठन

0 16

मुंबई, दि. 15 : आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली अथवा महिलांना सहाय्य करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीचे गठन करण्यात आले आहे.

नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत विवाह, धार्मिक स्थळी करण्यात आलेले विवाह, पळून जाऊन केलेले विवाह अशा प्रकारे आंतरधर्मीय विवाह केलेल्या व्यक्तींची माहिती प्राप्त करणे. नवविवाहीत मुली अथवा महिला तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करुन सद्य:स्थितीत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत किंवा कसे? याबाबत माहिती घेणे. स्वतःच्या कुटुंबियांच्या संपर्कात नसलेल्या मुली अथवा महिला यांची त्यांच्या आई- वडिलांच्या सहाय्याने माहिती घेणे. आई वडिल इच्छुक नसल्यास तज्ज्ञ समुपदेशकाद्वारे त्यांचे समुपदेशन करणे तसेच त्यांच्यामधील वाद-विवादाचे निराकरण करणे करीता व्यासपीठ उपलब्ध करुन याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरीता महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय तसेच अशासकीय सदस्यांची “आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती गठित केली आहे.

समितीमध्ये एकूण तेरा सदस्य

समितीचे अध्यक्ष मंत्री, महिला व बाल विकास आहेत.  प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई, आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे, सह सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई, संभाजीनगर (औरंगाबाद) चे संजीव जैन, नाशिकच्या सुजाता संतोष जोशी, मुंबईचे ॲड. प्रकाश साळसिगिकर, मुंबई, यदु गौडीया, नागपूर यांचा समावेश आहे. अकोलाच्या मीराताई कडबे, पुण्याच्या श्रीमती शुभदा गिरीश कामत, मुंबईच्या योगिता साळवी, मुंबईचे इरफान अली पिरजादे हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तर महिला व बाल विकास उपायुक्त हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

समिती घेणार विभागीय तसेच जिल्हा स्तरावरील अधिकारी यांचा आढावा

ही समिती खालील विषयाशी संबंधित विभागीय तसेच जिल्हा स्तरावरील अधिकारी यांची आवश्यकतेनुसार बैठका घेऊन आढावा घेईल. नोंदणीकृत विवाह, अनोंदणीकृत आंतरधर्मीय विवाह, धार्मिक स्थळी करण्यात आलेले आंतरधर्मीय विवाह, पळून जाऊन केलेले आंतरधर्मीय विवाह, विवाह केलेल्या नवविवाहीत मुली अथवा महिला तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून सद्य:स्थितीत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत किंवा कसे  याबाबत माहिती संकलित करणे,आंतरधर्मीय विवाह केलेल्या तथापि, कुटुंबियाच्या संपर्कात नसलेल्या महिलांकडून त्यांच्या आई-वडिलांचा पत्ता घेऊन त्यांना माहिती देणे.आई-वडिल इक्छुक नसल्यास तज्ज्ञ समुपदेशकाद्वारे त्यांचे समुपदेशन करणे हे या समितीचे मुख्य काम राहणार आहे.

आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती करणार अभ्यास आणि शिफारसी

महिला व बाल विकास विभागामार्फत समाजातील आंतरधर्मीय विवाहाबाबतचे प्रश्न, धोरण, कायदे, कल्याणकारी उपक्रमाबाबत केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनांचा अभ्यास करणे त्यामध्ये आवश्यक ते बदल सुचविणे तसेच या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उपाययोजनांची शिफारस करणे. या समितीची बैठक आवश्यकतेनुसार करण्यात येईल. या समितीने राज्यातील आंतरधर्मीय विवाह, त्यामधील समस्या व त्यावरील उपाययोजना व इतर अनुषंगिक बाबींच्या अनुषंगाने सविस्तर शिफारशी करणे, समितीने केलेल्या शिफारशीनंतर शासनस्तरावरुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल व त्यानंतर समितीचे कार्य संपुष्टात येईल.

मुली अथवा महिलांना मदतीसाठी उपलब्ध होणार हेल्पलाइन क्रमांक

आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली अथवा महिलांना काही तक्रार उद्भवल्यास त्यांच्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येईल. सदर समिती हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झालेल्या तक्रारींची तपासणी करुन त्यानुसार योग्य ती  कार्यवाही करेल, असे या समितीचे कामकाज असेल. याबाबत शासनाने नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे.

0000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.