औषध खरेदी आणि यंत्रसामुग्रीसाठीचा निधी विहित वेळेत खर्च व्हावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

0 11

मुंबई, दि. 14: हाफकिन इन्स्टिट्यूटला विविध यंत्रसामग्री आणि औषध खरेदीसंदर्भात दिलेला निधी विहित वेळेत खर्च होईल, यासाठी नियोजन करा. औषध खरेदी अथवा यंत्रसामग्री खरेदी प्रक्रिया झाली नाही तर त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होऊ शकतो. केवळ तांत्रिक बाबींमुळे निधी परत जाणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे हाफकीन इन्स्टिट्यूटच्या निधी विनियोगाबाबतचा आढावा मंत्री श्री. महाजन यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, विभागाला औषध आणि यंत्रसामुग्री आणि इतर बाबींसाठी निधी मिळाला तर तो वेळेत खर्च करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. अन्यथा तो निधी पुन्हा त्या बाबींसाठी मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे एखाद्या बाबतीत आवश्यकतेनुसार सुधारित प्रशासकीय मान्यता तत्काळ घेऊन कार्यवाही पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण वेळेत औषध खरेदी अथवा यंत्रसामग्री खरेदी प्रक्रिया झाली नाही, तर त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया गतीने राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी हाफकीन इन्स्टिट्यूटसाठी गेल्या पाच वर्षात मिळालेला निधी आणि औषध खरेदी आणि यंत्रसामुग्री खरेदीसाठी आवश्यक असणाऱ्या निधींबाबत हाफकीन इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालक सुमन चंद्रा यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

वैद्यकीय शिक्षण सचिव अश्विनी जोशी,  वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.