पर्यावरणपूरक जीवनशैलीतूनच शाश्वत विकास शक्य

0 13

मुंबई, दि. १३ : पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारुनच शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य केली जाऊ शकतात. त्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी वर्तणूक बदल घडवून आणावा लागेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

जी 20 परिषदेच्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठकीतील इन्फुसिंग न्यू लाईफ इनटू ग्रीन डेव्हलपमेंट परिसंवादात बोलताना सहभागी तज्ज्ञांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. जिओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे आज हे चर्चासत्र झाले.

सामान्य नागरिकांच्या वर्तनात बदल करणे शक्य आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा आणि प्राधान्यक्रमाच्या गरजांची पूर्तता केल्यास सामान्य नागरिकांकडून बदल स्वीकारले जातात. दहा वर्षापूर्वी सौरऊर्जा प्रकल्प साधने खूप महाग होती. आता या साधनांची किंमत कमी झाल्यामुळे सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा, साधनांचा वापर वाढला असल्याचे नमूद करण्यात आले. गुजरातमधील मोढेरा गाव पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारे गाव असल्याचे, कौन्सिल फॉर इन्व्हायरमेट एनर्जी ॲण्ड वॉटरचे अरुणभा घोष यांनी सांगितले.

या चर्चासत्रात युनायटेड किंग्डमचे खासदार लॉर्ड निकोलस स्टर्न, युनिडोचे संचालक स्टीफन सिकार्स, एको नेटवर्कच्या संचालक शॅनॉन ओल्सन यांनी आपली मते मांडली. या सर्वांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी सर्वच संबंधितांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे, यावर भर दिला.

तत्पूर्वी, चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात आयआरइनएनएच्या उपमहासंचालक गौरी सिंग, इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल एन्व्हायर्न्मेंटल स्ट्रॅटेजीचे कार्यक्रम संचालक अत्सुशी वाताबे, संयुक्त राष्ट्र संघाचे आर्थिक आणि सामाजिक कार्य विषयक महासंचालक नितीन देसाई, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे प्रोफेसर नवरोज दुभाष यांनी आपले मुद्दे मांडले. टाइम्स नेटवर्कच्या वरिष्ठ संपादक तमन्ना इनामदार यांनी या चर्चासत्राचे संचलन केले.

साधी जीवनशैली स्वीकारावी : सोनम वांगचूक

शहरातील नागरिकांनी साधी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन शिक्षणक्षेत्रात नवोपक्रम राबविणारे सोनम वांगचूक यांनी केले.

श्री. वांगचूक यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत हिमालय पर्वताच्या परिसरात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. पूर परिस्थिती उद्भवली. वातावरणातील बदलामुळे या आपत्ती आल्या. बदलत्या जीवनशैलीमुळे वातावरणात बदल होत आहेत. यासाठी साधी जीवनशैली स्वीकारावी. शहरातील नागरिकांनी साधी जीवनशैली स्वीकारली तर पर्वतराजी आणि नैसर्गिक सानिध्यात राहणारे नागरिक सुरक्षित जीवन जगू शकतील.

*****

रवींद्र राऊत/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.