लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी पशुपालकांना ३४ कोटी वितरित – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0 10

मुंबई, दि. १२ : लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा १२ हजार ४७१ पशुपालकांच्या खात्यांवर रु. ३३.८५ कोटी रुपयांची रक्कम नुकसान भरपाईपोटी जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, १२ डिसेंबरअखेर ३५ जिल्ह्यांमधील एकूण 4001 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ३ लाख ७५ हजार ५७६ बाधित पशुधनापैकी एकूण २ लाख ९६ हजार ५७४ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.  राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४४.१२ लक्ष लस  उपलब्ध असून, त्यापैकी एकूण १३९.८९ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. तसेच, खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारी नुसार राज्यात सुमारे  १०० % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असल्याने या पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना मंत्री श्री विखे पाटील यांनी दिल्या.

श्री. विखे पाटील यांनी आवाहन केले आहे की,  गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवाव्यात. तसेच, सुधारीत उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन असल्याने स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी  पशुधनावर उपचार करण्यासाठी पशुपालकांना सहकार्य करावे.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृती दलासमवेत  झालेल्या बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण  न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहन मंत्री श्री.विखे पाटील यांनी केले आहे.

000

राजू धोत्रे/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.