आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि मेगा फूड इव्हेंट २०२३ मध्ये महाराष्ट्राचा सहभाग
नवी दिल्ली, 10 : वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यासोबतच ऑक्टोबर 2023 मध्ये मेगा फूड इव्हेंट चे आयोजन केले जाणार आहे. यात महाराष्ट्रचा सहभाग असणार आहे.
येथील विज्ञान भवनमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या (एफपीआय) वतीने ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि मेगा फूड इव्हेंट 2023’ या विषयावरील बैठकीचे आयोजन येथे करण्यात आले. सर्व निवासी आयुक्तांसोबत अन्नप्रक्रिया उद्योग सचिव अनिता प्रवीण यांनी ही बैठक घेतली. या बैठकीस महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार उपस्थित होते.
हा मेगा इव्हेंट ऑक्टोबर 2023 मध्ये आयोजित केला जाणार असून कार्यक्रमाचे स्वरुप मोठ्या प्रमाणावर राहणार. हा कार्यक्रम विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विशिष्ट संधी प्रदर्शित करण्यासाठी असणार आहे. जागतिक आणि स्थानिक व्यावसायिक, पुरवठादार, खरेदीदार आणि सहयोग करणारे तंत्रज्ञान प्रदाते यांच्याशी संवाद साधण्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. अन्न प्रक्रिया आणि अन्न किरकोळ क्षेत्रात गुंतवणूक आणि या क्षेत्रामध्ये स्वारस्य निर्माण करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ प्रदान करणार असल्याचे यावेळी सचिव श्रीमती प्रवीण म्हणाल्या.
सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी अभिप्राय मागविण्यात आले. त्यांना या कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. या मेगा फूड इव्हेंटमध्ये धोरण निर्माते, कृषी-खाद्य कंपन्या, अन्नप्रक्रिया उद्योग, बचत गटांना(SHG) आणि सर्व संबंधित भागधारकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी मंत्रालयाला पाठिंबा देण्याची विनंती श्रीमती प्रवीण यांनी यावेळी केली.
पुढील वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचा’ भाग म्हणून, मंत्रालयाकडून भरडधान्य आणि भरडधान्यावर आधारित मूल्यवर्धित उत्पादनांच्या अनेक फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रमांची योजना आखली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सर्व सहभागी निवासी आयुक्तांनी (RCs) वर्ष 2023 मधील सर्व नियोजित उपक्रमांमध्ये आणि मेगा फूड इव्हेंट 2023 दरम्यान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला(MoFPI) पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
या संदर्भातल्या काही अभिप्रायांमध्ये, निवासी आयुक्तांनी मेगा फूड इव्हेंटच्या केंद्रित मोहिमेची गरज तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये भरड धान्यांचे फायदे सांगण्याची गरज यावेळी व्यक्त करन्याय आली. राज्यांच्या राजधानीत नियोजित परिषदा आणि प्रदर्शना व्यतिरिक्त जिल्हास्तरीय शिखर परिषदांचे आयोजन केले जाईल. पारंपारिक पैलूंचे प्रदर्शन करण्यासाठी लहान उद्योजक, अन्नप्रक्रिया उद्योग(FPO), बचत गटांना (SHGs) सहभागी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर या भव्य इव्हेंटच्या जाहिरातीसाठी पर्यटन उद्योगाशी संभाव्य सहकार्य घेणे या महत्वपूर्ण सूचनांचा समावेश समावेश करण्यात आल्या.
महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यात भरड धान्य उत्पादित केले जाते तेथे तेथे अशा परिषदांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना श्रीमती डांगे यांनी यावेळी केली.
या बाबतीत गुंतवणूक सुविधा सेल (इन्व्हेस्ट इंडिया) ला सूचित करण्यात आले आहे की, कार्य योजना लागू करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधावा आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यासाठी आवश्यक समर्थन सुनिश्चित करा.
अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे अनिता प्रवीण (FPI) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भारतीय अन्न प्रक्रिया क्षेत्राचे सामर्थ्य दाखवण्यासाठी मंत्रालयाशी संलग्न होण्यासाठी तसेच मेगा इव्हेंटचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.