सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाने लावणीचा अभिजात सूर हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.१० : लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाने लावणीचा अभिजात सूर हरपल्याची शोक भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
बैठकीची लावणी किती समृद्ध असावी याचा वस्तुपाठ सुलोचनाताईंनी घालून दिला होता. अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्यांनी ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातून ठसका व खटका देण्याचे काम सुलोचनाताईं इतके कोणीही उत्तम करू शकलेले नाही. पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरूवात ठसकेबाजच झाली पाहिजे, असे सुलोचनाताईंचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच. सुलोचनाताई लावणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शास्त्रीय गायकीचे कोणतेही विधीवत शिक्षण न घेता दीर्घकाळ त्यांनी लावणीच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटविलेला ठसा कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी गायलेल्या लावण्यांनी जनमानसाच्या हृदयात मानाचे स्थान मिळविले आहे. लावणीला राजमान्यता, लोकमान्यता व प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या सुलोचनाताईंच्या निधनाने या क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.