ऊसतोडणी कामगारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
मुंबई, दि. 7 : ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या घटनांबाबत संशोधनपर अहवाल तयार करावा. तसेच ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांना आरोग्य, स्वच्छता आणि मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनांबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
विधिमंडळात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा डॉ. तानाजी सावंत दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महिला व बालविकास आयुक्त आर. विमला, कामगार आयुक्त सुरेश जाधव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ऊसतोडणी कामगारांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांतही गर्भाशय काढण्याच्या घटनांबाबत संशोधनपर अहवाल तयार करण्यात यावा. त्यासाठी सर्वेक्षण आणि संशोधन करावे.
ऊसतोडणी कामगारांची तोडणी हंगामापूर्वी आणि हंगाम पूर्ण झाल्यावर वैद्यकीय तपासणी करावी. ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करावी. ऊसतोडणी कामगारांच्या जाण्या-येण्याच्या मार्गाचे तपशील ठेवावे. त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्यात मदत करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
ऊसतोडणी कामगारांना आरोग्य, निवास आणि मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रमुख नियोक्ता यांच्याशी करावयाच्या कराराचे प्रारुप निश्चित करण्यात यावे. या करारात महिला, मुले आणि मुली यांना प्राधान्य देण्यात यावे. प्रारुप तयार करताना सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, कामगार आणि ऊस तोडणी कामगार महामंडळ यांच्याकडून सूचना घेतल्या जाव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत पुढील आठवड्यात आरोग्य विभागाच्या सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
बैठकीत प्रादेशिक साखर सहसंचालक शरद झरे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळाचे सहायक आयुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी ऊसतोडणी कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली.
बैठकीस सहसचिव व्ही. एल. लहाने, सहकार विभागाचे उपसचिव अं. पां. शिंगाडे, प्रादेशिक साखर कामगार उपायुक्त सुनीता म्हैसकर, चंद्रकांत राऊत, औद्योगिक सुरक्षा संचालक मु. र. पाटील आदी उपस्थित होते.
०००
रवींद्र राऊत/विसंअ