मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. ६ :- ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांच्या निधनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत अखंड सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांनी अखंड आयुष्य मराठी कला क्षेत्राला अर्पण केले. रंगभूमीच्या सेवेचे व्रतच त्यांनी घेतले होते. मराठी साहित्य आणि रंगभूमी क्षेत्रातील अनेक चळवळी, घडामोडींशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते स्वतःला या क्षेत्रातील कार्यकर्ता म्हणवत. त्यांनी या क्षेत्रातील कित्येक उदयोन्मुख तरुणांसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली. या होतकरूंसाठी ते आधारवड होते. त्यांच्या निधनामुळे कला-साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात पिढ्यांना जोडणारा महत्वाचा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’
०००