वन्यजीव, पर्यावरण संरक्षण हे ईश्वरीय कार्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0 10

मुंबई, दि. 6 : भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे, अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतीक सिंह  आहे. जंगलाचा हा राजा  राज्यातील  वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी उद्यानात सोडताना अतिशय आनंद होत असून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे, असे उद्गार वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

गुजरात येथून आणलेल्या सिंहाची जोडी बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. वनग्रंथालयाचे भूमीपूजन आणि सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजर (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्राचे उद्घाटनही श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार गोपाल शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश वाघ, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता, सतीश वाघ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन, क्लामेंन्ट बेन उपस्थित होते.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, “संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्त करण्यात आलेल्या सिंहांना भारतीय स्टेट बँकेने दत्तक घेतले याचे कौतुक आहे. वनांचे काम मनापासून करा, हे ईश्वरीय कार्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ईश्वराची देण आहे, वसुंधरा म्हणजे पृथ्वीच्या जडणघडणीत देवाने आर्किटेक्ट म्हणून भूमीका निभावली, त्या अमूल्य वसुंधरेच्या संवर्धनाची जबाबदारी सारे मिळून सांभाळूया. संजय गांधी उद्यानातील सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजराचे (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्र हे देशातील एकमेव संवर्धन केंद्र आहे, ते देखील आपण जपूया असे ते म्हणाले.

खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कामात सातत्य कायम ठेवले. सिंहाच्या अधिवासामुळे बोरीवली येथील जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय उद्यानाच्या वैभवात श्री. मुनगंटीवार यांनी भर घातली. या उद्यानाकडे पर्यटकांचा ओढा वाढावा, यासाठी उपाय करण्याची मागणी त्यांनी केली. येत्या काळात राज्याचा वनविभाग उत्कृष्ट प्रगती करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘वन ग्रंथालय’ हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वैभवात भर घालेल.

उद्यान व्हावे ज्ञानाचे केंद्र

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेन चालवण्यात येते. ही ट्रेन केवळ पर्यटन आणि मनोरंजनापुरती मर्यादित राहू नये, तर ती ज्ञानदानाचे केंद्र बनावी, अशी अपेक्षा वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. चंद्रपुरात अलीकडेच ‘टॉकिंग ट्री’चा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे असेच आधुनिक उपक्रम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राबविले जावे, असे ते म्हणाले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.