नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
शिर्डी, ४ डिसेंबर (उमाका वृत्तसेवा) :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली.
नागपूर येथील समृद्धी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा हा पाहणी दौरा सायंकाळी ५ वाजता शिर्डी येथे पोहोचला. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, सदाशिवराव लोखंडे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. या दौऱ्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अधिकारी सहभागी झाले आहेत. यावेळी कोपरगांव इंटरचेंज येथे आमदार बबनराव पाचपुते, आमदार आशुतोष काळे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची लांबी ७०१ किलोमीटर आहे. काम पूर्ण झालेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याची लांबी ५२० किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर आहे. यासाठी कोपरगाव तालुक्यातील १० गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. कोपरगांव इंटरचेंज पासून शिर्डीचे अंतर १० किलोमीटर आहे.
00000