‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाची उद्यापासून पंधरा वॉर्डमध्ये सुरूवात – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 30 : ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील पंधरा वॉर्डमध्ये उद्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. प्रत्येक वॉर्डमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून ते यशस्वी करूया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ हे अभियान मुंबई महापालिकेमार्फत राबविण्यात येणार असून त्यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांचा सक्रिय सहभाग आहे. मुंबई उपनगरातील पंधरा वॉर्ड मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना, स्वयंसेवी संस्था, शासनाचे सर्व विभाग, नागरिक यांना ज्या – ज्या वॉर्डमध्ये शक्य होईल तिथे आपला परिसर, शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, सागरी किनारे यांची स्वच्छता करावी.
दि. 1 ते 31 डिसेंबर 2022 या अभियान कालावधीत प्रत्येक शनिवार, रविवारी जेवढा वेळ श्रमदान करता येईल, तेवढ्या वेळात सर्वांना संबंधित वॉर्डमध्ये स्वच्छतेचे उपक्रम राबवता येतील. सार्वजनिक ठिकाणांमध्ये रस्ते, पदपथ, रेल्वे फलाट, उद्याने, मंडई, शाळा, महाविद्यालये, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, सागरी किनारे, पर्यटनस्थळे, उड्डाणपूल इत्यादी ठिकाणी युद्धपातळीवर काम करता येईल, असेही मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले.
000
संध्या गरवारे/विसंअ/