रेशीम उद्योगासाठी राज्यस्तरीय योजना तयार करावी – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

0 11

मुंबई, दि. 30 : शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोड उद्योगासाठी रेशीम शेतीपूरक ठरत आहे. रेशीम उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर रहावा, यासाठी राज्यस्तरीय योजनेचा विस्तृत आराखडा तयार करावा, असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्री श्री. पाटील यांच्या शासकीय निवासस्थान, सिंहगड (ब-2), मुंबई येथे रेशीम संचालनालयाचे कामकाज आणि उपाययोजना, रिक्त पदे तसेच राज्यातील सहकारी सूत गिरण्यांच्या अडचणींबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्रसिंग, आयुक्त पी. शिवशंकर,  रेशीम संचालक प्रदीप चंद्रेन तसेच संचालनालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, शेतीबरोबरच शेतकऱ्यांना जोड उद्योगासाठी रेशीम शेतीपूरक ठरत आहे. त्यासाठी रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देणऱ्या राज्य रेशीम योजना सिल्क समग्र 2 या योजनेच्या धर्तीवर तयार करावी. या योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

सध्या राज्यात १३ हजार ५८१ एकर तुती लागवड आहे. पुढील एका वर्षात 5 हजार एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवावे त्या दृष्टीने महा रेशीम अभियान राबवावे आणि महाराष्ट्राचा रेशीम उद्योगामध्ये ब्रँड तयार करवा, असे सांगून वस्त्रोद्योग मंत्री श्री. पाटील यांनी रेशीम संचालनालयातील कामकाजाचा आढावा घेऊन रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना दिल्या.

देशात रेशीम उद्योगात अग्रेसर असलेल्या राज्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करावी. या समितीने राज्यांचा अभ्यास करुन  अहवाल सादर करावा. त्यामुळे राज्यातील रेशीम उद्योगाला चालना मिळेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

000

काशिबाई थोरात/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.