शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
नागपूर दि.२७ : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला वाव आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये ही बाब शक्य आहे. बांबू संदर्भातील नवनवीन संशोधन सुरू असून शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग मंत्री तथा नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात ॲग्रोव्हीजन हे मध्यभारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन सध्या पी.डे.के.व्ही. ग्राऊंड दाभा, अमरावती रोड येथे सुरु आहे. आज बांबू उत्पादन संदर्भातील सत्रामध्ये मार्गदर्शन करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बांबू उत्पादनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबू उत्पादनासंदर्भात वनमंत्री म्हणून अनेक प्रयोग केले आहेत त्यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर येथे जागतिक दर्जाचे बापू रिसर्च ट्रेनिंग सेंटर सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर आशा पटेल व अन्य मान्यवर उपस्थित होते.
जागतिक स्तरावर बांबूची मोठी व्यापार पेठ असून चीन व आशिया खंडातील अन्य देशांमध्ये बांबूवर आधारित अर्थव्यवस्था बळ घेत आहे. बांबू उत्पादन योग्य प्रकारे हाताळल्यास हे पीक कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते. हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे. अन्न-वस्त्र-निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या सर्व क्षेत्राला बळकटी देण्याचे काम बांबूचे उत्पादन करू शकते. चंद्रपूर येथे तयार करण्यात आलेल्या बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. बांबूपासून धानापर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच वनविभाग मनरेगा, जलसंधारण विभागाची बैठक घेतली जाईल. जलसंधारण विभागाच्या सर्व नाल्याकाठी बांबूची लागवड करण्याबाबतचा विचार केला जात आहे. याशिवाय पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मदतीने टिशू कल्चर मध्ये मिशन मोडवर काम करण्याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या बांबू लागवडीसाठी चार हेक्टर पर्यंत 80 टक्के अनुदान दिले जाते. त्यानंतर 50% अनुदान दिले जाते. बांबूवर आधारित अनेक अभ्यासक्रम गोंडवाना विद्यापीठात सुरू करणार आहेत. बांबूपासून उत्तम दर्जाचे टॉवेल तयार होतात. बांबू पासून डिझेल तयार करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असून यासंदर्भात ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीची बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बांबू जीवनाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत उपयोगी येणारे कल्पवृक्ष आहे. बांबू एकदा लावल्यानंतर तीन वर्षानंतर हार्वेस्टिंग सुरू होते. योग्य पद्धतीने लागवड केल्यास त्यातून निश्चित फायदा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवडीकडे वळावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
‘ऍग्रो व्हिजन ‘च्या आयोजनाबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. कल्पकतेने लोकांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी, समाज परिवर्तनासाठी त्यांची कायम धडपड असल्याचे सांगितले. यावेळी अॅग्रो व्हिजनच्या संयोजकांनी या व्यासपीठावर होणाऱ्या चर्चेच्या मुद्द्यांवर वर्षभरात समाधान निघाले पाहिजे याकडे लक्ष वेधण्याच्या आवाहन केले. या ठिकाणी होणारी चर्चा व त्यातून निष्पन्न होणारी फलश्रुती यावर आयोजनाचे यश अवलंबून असते याकडेही लक्ष वेधण्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
*****