देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि 25:- देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला 26/11 चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे. या कटू आठवणी न मिटणाऱ्या आहेत. मात्र असे दुःसाहस करणाऱ्यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत केले जाईल हे देशाने कृतीतून दाखवून दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हॉटेल ताजमहल पॅलेस येथे आयोजित ’26/11 मुंबई संकल्प’ या कार्यक्रमात श्री.फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईवर झालेला 26/11चा हल्ला अतिशय सुनियोजित होता. पर्यटक, राजदूत अशा काही घटकांना विशेष करून लक्ष्य करण्यात आले. पण या हल्ल्यानंतर मुंबईकरांच्या अभूतपूर्व एकजुटीचे पुन्हा एकदा दर्शन घडले. मुंबई पुन्हा एकदा नव्या दमाने लगेच उभी राहिली. मुंबईला नमविण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे मुंबईकरांनी उधळून लावले. 26/11 च्या हल्ल्यानंतर सर्वशक्तीनिशी लढा देत आपण देशाच्या शत्रूंचे पितळ उघडे पाडण्यात यशस्वी झालो हे नक्की, आणि आता जर आपल्यावर कोणी हल्ला करेल तर त्याला सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करण्यात येईल हा इशारा आपण कृतीतून देऊन आक्रमक दृष्टिकोन घडवला आहे, असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.
श्री.फडणवीस म्हणाले, 26/11 च्या हल्ल्यानंतर एक अहवाल सादर करण्यात आला होता. त्यातील शिफारशींनुसार मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम आमच्या शासनाच्या कालावधीत वेगाने पूर्ण करण्यात आले. याचाच दुसरा टप्पा देखील सुरू करण्यात येत आहे. हा टप्पा अधिक प्रगत आणि प्रभावशाली असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सागरी सुरक्षेतील अडथळे, त्रुटी दूर करण्यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
श्री.फडणवीस म्हणाले,आजची मुंबई भयमुक्त आहे. महिलांसाठीही मुंबई हे देशातील अन्य कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक सुरक्षित शहर आहे. अर्थातच याचे श्रेय शासनाबरोबरच मुंबईकरांनाही नक्कीच आहे, कारण मुंबईकर शिस्तीला खूप महत्त्व देतात.
देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. देशाची अर्थव्यवस्था आज झपाट्याने प्रगती करत आहे. राज्याला ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करत असताना याला गती देण्याचे महत्त्वाचे काम ‘एमएमआर’ क्षेत्र विशेषत्वाने करत आहे. आता तिसरी मुंबई आकाराला येत आहे. ‘जेएनपीटी’ बंदर कंटेनर ट्रॅफिकचा मोठा भार उचलते. पण आता आपण वाढवण बंदराच्या उभारणीद्वारे निर्यात क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकणार आहोत. या बंदराची क्षमता सर्वार्थाने मोठी असणार आहे. समृद्धी महामार्गाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रच आता ‘पोर्ट कनेक्टेड’ झाला आहे. हा महामार्ग ‘फायनान्शियल एक्सप्रेस वे’ ठरणार आहे. देशाच्या हृदयस्थानी असलेले नागपूर शहर देखील लॉजिस्टिकच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. गतिशक्ती योजनेच्या माध्यमातून लॉजिस्टिकची मोठी साखळीच आता देशभरात निर्माण होत आहे. आणि यामध्ये नागपूरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत क्षेत्रासह अनेक महत्त्वाकांक्षी मोठे प्रकल्प साकार झाले आणि होत आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
– – – 000- – –