पावसावर अवलंबित कृषी प्रणालीत बदलासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे
अमरावती, दि. 22 : पावसावर अवलंबून असलेल्या कृषी प्रणालीत विकास घडवून आणण्यासाठी विविध योजनांची सांगड घालून सर्व विभागांनी संघटीत व सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दिले.
विभागीय आयुक्तालयात पश्चिम विदर्भात पावसावर अवलंबून असलेल्या शेती प्रणालीबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. महाराष्ट्र आरआरए नेटवर्कचे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषि, मनरेगा, आदिवासी विकास विभाग, जलसंधारण, वने, पशुसंवर्धन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी संशोधनात महाराष्ट्र अव्वल राज्य असले तरीही प्रत्यक्षात बहुतांश शेती अद्यापही मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी केवळ खरिप पिके घेऊ शकतात. सोशिओ इकॉनॉमिक सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील 37.05 टक्के कुटुंबे शेतीवर व 44.37 टक्के कुटुंबे शेतीविषयक मजूरी कामांवर अवलंबून आहेत. त्यातही दोन हेक्टरहून कमी जमीन असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पावसाधारित शेती पद्धतीत सुधारणा अत्यावश्यक आहेत. त्यात बहुविध पिकपद्धती, शेतमाल विपणन, पूरक व्यवसायांबरोबरच कृषी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयपूर्वक प्रयत्न करण्याचे निर्देश डॉ. पांढरपट्टे यांनी दिले.
पश्चिम विदर्भातील शेतकरी अद्यापही पावसाधारित शेतीवर, वनाधारित उत्पादनांवर अवलंबून आहेत. त्यात विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र आरआरए नेटवर्क या संस्थेने प्रकल्प हाती घेतला आहे. त्याद्वारे शेती विषयक सुधारणांसाठी उपाययोजना राबविणे, शेतीवर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे जीवनमान उंचावणे, सर्व शासकीय संबंधित विभागांचा समन्वय ठेवणे, योजनांमधील त्रुटी दूर करणे, परिस्थितीनुरूप बदल घडवणे व दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आदी कामे करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली.
0000