पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांची जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट – महासंवाद

0 17




नंदुरबार, दि. ०६ (जिमाका): कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी आज अचानक नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध कक्षांची पाहणी करून रुग्णांसोबत संवाद साधला आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य व्यवस्थेची माहिती घेतली.

यावेळी मंत्री ॲड. कोकाटे यांनी १०८ रुग्णवाहिकांच्या वारंवार नादुरुस्त होणाऱ्या समस्येवर तातडीने लक्ष घालून राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी थेट भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला. त्यांनी नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यासाठी नव्या १०८ रुग्णवाहिका त्वरीत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीवर तांत्रिक अडचणी दूर झाल्याची माहिती देत आरोग्यमंत्र्यांनी लवकरच सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबतही मंत्री ॲड. कोकाटे यांनी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावरही लवकरच भरती प्रक्रियेस सुरुवात होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मंत्री ॲड. कोकाटे यांनी अपघात कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष आणि प्रसूती कक्ष यांची पाहणी केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषध साठ्याची माहिती घेतली व गरज भासल्यास तातडीने औषधे पुरवण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील सिकलसेल व इतर आजारांमुळे गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात रक्ताच्या पिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपाययोजना कराव्यात, अशी सूचना देखील त्यांनी केली.

पुरुष सर्वसामान्य कक्षात रुग्णांच्या अन्न व्यवस्थेची व सेवा समाधानाची चौकशी करत मंत्री ॲड. कोकाटे यांनी रुग्णांची मते जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांताराव सातपुते, तहसीलदार मिलिंद कुलथे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. अभिजीत मोरे, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००







Source link

Leave A Reply

Your email address will not be published.