गुढीपाडवा सकारात्मकता, नवउत्साहाचा सण – सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला – महासंवाद

0 8

नवी दिल्ली, दि. ३०: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत, राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू असलेला नववर्ष स्वागताचा सण संपूर्ण देशभर मोठ्या श्रद्धेने आणि आनंदात साजरा करण्यात येतो. राजधानी नवी दिल्लीतही महाराष्ट्र सदनाच्या वतीने कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांनी गुढी उभारली. त्यानंतर कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी गुढी प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी सुमनचंद्रा, भारतीय प्रशासकीय सेवेतील अन्य वरिष्ठ अधिकारी, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, सारिका शेलार, यांसह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुढीपाडव्या निमित्त महाराष्ट्र सदनात स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त मराठमोळ्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत, निवासी आयुक्त आर. विमला यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुढीपाडव्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व यावेळी विशद केले. “गुढीपाडवा हा नवउत्साह, समृद्धी आणि सकारात्मकतेचा सण आहे. महाराष्ट्राबाहेरही तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, ही अभिमानास्पद गोष्ट आहे,” असे सांगत, त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धीचे आणि आनंददायी जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

०००

अमरज्योत कौर अरोरा

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.