बॅनरवर नाही तर जमिनीवर विकास दिसला पाहिजे; गावच्या विकासासाठी एक व्हा – पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

0 10

पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रम संपन्न

गावच्या विकासासाठी भरीव निधी ;ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढली- वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे

जिल्हा वार्षिक नियोजनचे शंभर टक्के निधी खर्चा बद्दल दोन्ही मंत्र्यांनी पालकमंत्री आणि प्रशासनाचे केलं कौतुक

जळगाव दि. २९ : गावाच्या विकासासाठी विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. गावचा विकास हा लोकांच्या मनात ठसला पाहिजे . त्यासाठी सरपंचासह सर्वांनी पुढाकार घेऊन मेहनत घेणे गरजेचे असते. बचत गटाच्या महिला अधिकाधिक सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी जिल्हाभर बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून सुसज्ज अशा मॉलचे निर्मिती करण्यात येत आहे. गावाचा विकास बॅनरवर नाही, तर जमिनीवर दिसला पाहिजे.” असं सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केले.ते जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजना’ च्या विशेष जन सुविधा अनुदान अंतर्गत प्रशासकीय मान्यता वितरण व घरकुल धारकांना जागा वाटप सोहळ्यात बोलत होते. दिनांक 29 मार्च रोजी सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे होते.

यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. राजू मामा भोळे, आ. अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे , जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी बांधकामांचे व घरकुल धारकांना जागा वाटप आदेश वितरण

या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे व मान्यवरांच्या हस्ते जिल्हाभरातील ग्रामपंचायतचे सरपंच तसेच ग्रामसेवक यांना 45 ग्रामपंचायत भवन , 130 स्मशानभूमी बांधकाम, स्मशानभूमी पोहोच रस्ते अश्या विविध विकास कामांच्या योजनांच्या आदेश वाटप करण्यात आले. तसेच राज्य शासनाच्या सरळ सेवा भरती अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 कंत्राटी ग्रामसेवकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा भारातून सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या खुमासदार व मिश्कील शैलीत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याचा अहवाल क्रमांक राहिला आहे. यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेने मेहनत घेऊन कामे मार्गी लावली आहे. गेल्या कालावधीत जळगाव जिल्ह्याने शाळांना संरक्षक भिंत ही अभिनव योजना राबवली या योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत. मागील कालावधीत जळगाव जिल्ह्यातील जवळपास 500 शाळांमध्ये आपण संरक्षक भिंत उभारून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करून देऊ शकलो आहोत. पालकमंत्री ग्रामपंचायत विकास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या ग्रामपंचायतीची इमारत नसेल अशा ग्रामपंचायतींना सुसज्ज अशी 45 इमारती आपण मंजूर केल्या आहेत. यासाठी उत्कृष्ट इमारती उभ्या राहाव्यात म्हणून ग्रामपंचायतिना बक्षीसाची योजना देखील आपण केली आहे. या गावात ग्रामपंचायतीची इमारत सुंदर असेल ते गाव विकसित असते अशी त्याची ओळख निर्माण होते. गाव सुंदर करायचे असेल तर त्यासाठी सरपंचांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. गावात देखील ‘जो काम करेगा वही गाव पे राज करेगा’ अशीच भूमिका येणाऱ्या काळात ग्रामस्थांनी घेणे गरजेचे आहे.. आमदार होणे सोपे असते मात्र कमी लोकांमधून निवडून येऊन सरपंच होणे कठीण असतं त्यामुळे निवडून आलेल्या सर्व सरपंचांवर देखील मोठी जबाबदारी आहे. असेही ते यावेळी म्हणाले.:ग्रा मपंचायतीच्या अनेक किस्से मिश्कीलपणे त्यांनी मांडून उपस्थितांचे मन जिंकली.

सरपंचानी मनात आणले तर गावाचे चित्र बदलू शकते.- मंत्री गिरीश महाजन

जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ग्राम पातळीवर सरपंच आणि सदस्यांनी मनात आणले तर गावाचे चित्र बदलू शकते. त्यासाठी सरपंचांनी इतर कामात गुंतून न राहता गावच्या विकासाचा विचार केला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पावले उचलत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. या पुढच्या काळात एकही कुटुंब स्वतःच्या घराशिवाय राहणार नाही या दृष्टीने सरपंचांनी पुढाकार घेऊन घरकुल योजना अधिक व्यापक केली पाहिजे. ग्रामसेवक व सरपंचांमध्ये समन्वय समन्वय ठेवून स्वच्छ गाव – सुंदर गाव करण्यासाठी सरपंचानी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढली; – वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे
मंत्री सावकारे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आपल्या मनोगत सांगितले की पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना कामे मिळणार असल्याने ग्रामपंचायतींना चांगल्या दर्जाची कामे आपल्या गावात करून घेता येणार आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढली असून गावच्या विकासाला पुढे नेण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे देखील यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पालकमंत्री ग्राम ग्रामपंचायत विकास योजना यासंदर्भात माहिती देत ग्रामपंचायतीने या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी कार्यक्रमाचा उद्देश व योजनेची व्याप्ती स्पष्ट केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन निवेदक हर्षल पाटील यांनी केले.
जिल्हा वार्षिक नियोजनचे शंभर टक्के निधी वितरणाबद्दल दोन्ही मंत्र्यांनी पालकमंत्री आणि प्रशासनाचे केलं कौतुक
जिल्हा वार्षिक नियोजनाचा शंभर टक्के निधी त्या त्या प्रशासकीय विभागाच्या विकासकामासाठी वितरित झाला. हे सातत्य जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचे असून याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहेत. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
यांच्या कामाचे कौतुक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.

0000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.