पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मैदानाची पाहणी – महासंवाद

0 8

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मैदानाची पाहणी – महासंवाद

अहिल्यानगर दि.२५- राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाडिया पार्क येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाची पाहणी केली. जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या क्रीडा विकासाच्या पर्वाचे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहिले पाऊल आहे, असे श्री.विखे पाटील यावेळी म्हणाले.

त्यांच्या समवेत आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आदी होते.

पालकमंत्र्यांनी स्पर्धा आयोजनाची माहिती घेतली. स्पर्धेच्या वेळी कुस्तीच्या आखाड्याभोवती प्रेक्षकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्पर्धेसाठी येणारे मल्ल, पंच आणि पदाधिकाऱ्यांची  चांगली व्यवस्था करावी. कुस्तीगीरांना कोणतीही अडचण येणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. स्पर्धा स्मरणीय होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाडिया पार्क येथील क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपये मंजूर केले आहे. यातील २० कोटीचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त होत आहे. यातून दर्जेदार सुविधा निर्माण कराव्या. आवश्यकता असल्यास अधिक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार जगताप यांनी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली. ८०० पेक्षा अधिक कुस्तीगीर, १५० पंच आणि २०० पेक्षा अधिक पदाधिकारी स्पर्धेसाठी येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे संतोष भुजबळ,  शिवाजी चव्हाण, अर्जुन शेळके, युवराज करुजले उपस्थित होते.

००००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.