विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राज्याच्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक – महासंवाद
मुंबई,दि.11 : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे कौतुक केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिथल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आमंत्रण दिले होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी 9 जानेवारी रोजी नवी दिल्लीत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुंबईचे महापालिका आयुक्त आणि मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मतदान केंद्र व्यवस्थापन, तेथील पायाभूत सुविधा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी समाज माध्यमांचा उपयोग आणि माध्यम देखरेख आणि नियंत्रण समितीच्या कामकाजाविषयी राज्याच्या कामकाजाची माहिती दिल्लीतील अधिकाऱ्यांना दिली. या कार्यशाळेला दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. एलिस वाझ, विविध जिल्हा निवडणूक अधिकारी, रिटर्निंग ऑफिसर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पीआयबीच्या मुंबई च्या उपसंचालक जयदेव पुजारी, आकाशवाणीचे वृत्त संपादक जीवन भावसार, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाज माध्यम तज्ञ पल्लवी जाधव यावेळी उपस्थित होते.
00000