मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. ९ : मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कारासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणानुसार युवा हा घटक महत्त्वाचा मानण्यात आला आहे. युवकांना व युवतींना त्यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या नवीन युवा धोरणानुसार राज्य व जिल्हा युवा पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत. जिल्हास्तर युवा पुरस्कार स्वरुप एक युवक व एक युवती यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रु. १०,०००/- व नोंदणीकृत संस्थेस गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रु. ५०,०००/- असे आहे.
विहीत नमुन्यातील अर्ज व माहिती तसेच शासन निर्णय www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर २०१३९९९२११२२०४३३२९ या संगणक संकेतांकावर उपलब्ध आहे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग ५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्जावरील लिंकवर सोबतच्या संकेतांकावरील शासन निर्णयात शेवटी उपलब्ध आहे. ३१ मार्च २०२५ या कालावधीत कार्यालयीन कामकाज दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण भरलेल्या विहीत अर्जाची प्रत, आवश्यक ती छायांकित केलेली कागदपत्रे (सत्यप्रत केलेली), तीन पासपोर्ट फोटो इ. सर्व कागदपत्रे पुस्तिकेच्या स्वरूपात एकत्रित करून बंद लिफाफ्यातच या कार्यालयात कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, समता नगर, कांदिवली, मुंबई येथे १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सादर करावे.
अधिक माहितीसाठी ०२२-२०८९०७१७ या क्रमांकाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा युवा पुरस्कार सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षाकरिता मूल्यांकन करण्यात येणार आहे. युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील पुरस्कार वर्षाच्या गत तीन वर्षामध्ये केलेले कार्य व कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनु-सूचित जाती, जमाती, जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्यशिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण हत्या, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वागीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण इ. बाबत कार्य, साहस इ. बाबतचे कार्य यानुसार मूल्यांकन होवून जिल्हास्तर युवा पुरस्कार ०१ मे २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातून युवक व युवती तसेच नोंदणीकृत संस्थांनी प्रस्ताव या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
००००
राजू धोत्रे/विसंअ/