गळीत हंगामातील ऊस उत्पादन, उत्पादकतेसाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई दि. ३१ :- साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), रिमोट सेन्सिंग (RS) व जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (GIS) वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
सहकार विभागाच्या पुढील १०० दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. एआय हे तंत्रज्ञान वापरात आल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांसाठीही ते फायदेशीर ठरू शकते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गाळपासाठी उपलब्ध ऊसाचे योग्य नियोजन करणे सोपे होईल.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत राज्यात १०० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये जागेनुसार ३०० मे. टन ते १००० मे. टनाची गोडाऊन बांधण्यात येणार आहेत. या योजनेतून गडचिरोली, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातही गोडाऊन उभी करावीत. तसेच सहकारी गृह निर्माण संस्थांचे १०० टक्के डिजिटलायझेशन करण्यावर भर द्यावा. साखर कारखान्यांना देण्यात आलेला मार्जीन मनी आणि साखर कारखान्यामधील वजन काटे मॉनिटरिंगबाबतही सहकार विभागाने दक्ष रहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/