राज्यातील खनिज संपदेला पर्यावरण संतुलनासह काल सुसंगत व्यवस्थापनाची जोड देऊ – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद
नागपूर, दि. 25 : राज्यात विपूल प्रमाणात उपलब्ध असलेली खनिज संपदा लक्षात घेता याचे योग्य ते कालसुसंगत व्यवस्थापन व पर्यावरण समतोलाच्या दृष्टीकोनातून अधिकाधिक विचार झाला पाहिजे. भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयातील वरिष्ठ संशोधकांनी यावर अधिक लक्ष केंद्रीत करुन नवनवीन संधी या क्षेत्रात कशा घेता येतील याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
डॉ. पंकज भोयर यांनी आज येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय कार्यालयास सदिच्छा भेट देऊन आढावा घेतला. यावेळी भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे महासंचालक, डॉ. टी. के. राव व संचालक डॉ. गजानन कामडे, उपसंचालक श्रीराम कडू, रोशन मेश्राम, सहसंचालक अंजली नगरकर यांनी त्यांचे स्वागत केले.
खनिज क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. याच बरोबर या क्षेत्राशी निगडीत होणारा औद्योगिक विस्तार, भविष्यातील संधी या लक्षात घेऊन त्याचे नियोजन असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. संचालनालयाअंतर्गत उपलब्ध मनुष्यबळ, मंजूर पदे व रिक्त पदे याबाबतचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी राज्यात प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यांतर्गत सुरू असलेले अन्वेषण प्रकल्प, लाईमस्टोन, गोल्ड, कॉपर, बॉक्साईट, आयरन या खनिजांचा समावेश असलेले प्रकल्प व त्याची राबविण्याची कार्यप्रणाली याबाबत त्यांनी माहिती करुन घेतली.
भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाअंतर्गत राज्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या प्रमुख व गौण खनिज, संचालनालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या पूर्वेक्षण योजना व दैनंदिन कामकाजाबाबत संचालक डॉ. कामडे यांनी माहिती दिली.
०००