थंडीची लाट प्रतिकुल हवामानापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय – महासंवाद
अमरावती, दि. 25 : हवामान खात्याच्या अंदाजानुसार 27 व 28 डिसेंबर दरम्यान विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा पाऊस तसेच थंडीची लाट येणार असल्याचे वर्तविण्यात आले आहे. त्यानुषंगाने प्रतिकुल हवामानापासून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विभागातील सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यात कुठेही आपातकालीन स्थिती उद्भल्यास त्याठिकाणी तत्काळ मदत व बचाव दल पोहचेल यादृष्टीने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात थंडीची लाट प्रतिकूल हवामानाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय उपाययोजना संदर्भात सविस्तर आढावा डॉ. पाण्डेय यांनी मंगळवार, दि. 24 डिसेंबर रोजी घेतला. यावेळी विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तसेच सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार सारंग ढोमसे प्रत्यक्षरित्या बैठकीला उपस्थित होते.
डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यांसह पाऊस व थंडीची लाट विदर्भात सर्वत्र येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी थंडीच्या लाटेपासून बचावासाठी उपाययोजना कराव्यात. शितलहरीच्या प्रभावापासून संरक्षणासाठी उपाययोजना नागरिकांना माहिती होण्यासाठी ‘काय करावे व काय करु नये’ याविषयी वृत्तपत्रातून व्यापक प्रमाणात जनजागृती करावी.
थंडीच्या लाटेपासून मनुष्य, पशुधन, शेतीपिकांचा बचाव करण्याबाबतही विविध उपाययोजनांची वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. नागरिकांना तत्काळ बचाव सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष 24×7 कार्यान्वित करावे. तसेच सर्व संबंधितांचे संपर्क क्रमांकांची यादी क्षेत्रीय, तालुका कंट्रोल रुम व बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना वितरीत करावी. जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय यंत्रणांनी मुख्यालयी उपस्थित राहावे. जिल्ह्यातील आपदा मित्र व आपदा सखी यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत गावागावात थंडीच्या लाटेपासून बचावासाठी ‘काय करावे व काय करु नये’ याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.
वादळी पावसामुळे झाडांचे नुकसान किंवा मोठी झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे यासाठी व वाहतुकीचा रस्ता पूर्ववत सुरु करण्यासाठी अग्निशमन विभागाचे पथक तयार ठेवावे. अवकाळी पाऊस तसेच थंडीची लाट, नैसर्गिक वीज यामुळे होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांमुळे वीज खंडीत झाल्यास वीज वितरण कंपनीच्या यंत्रणांना सज्ज ठेवावे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्याठिकाणी पथक पाठविण्यात यावे. जिल्हा शोध व बचाव पथके सर्व सोयी-सुविधांनिशी व बचाव साहित्यांसह 24 तास सज्ज ठेवावीत. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष 24×7 कार्यान्वित ठेवावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
0000