अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि.24 : अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यालय अधीक्षक समाज कल्याण मुंबई शहर यांनी केले आहे.
अल्पसंख्याक विभागामार्फत सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे.
याबाबत शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती आणि लाभार्थी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
1) विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2) विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील घटकातील असावा.पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व
पीएचडी साठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असेल.
3) विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला
उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर
विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला
उमेदवाराने वडिलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे
आवश्यक आहे.)
4) परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन वर्षे कालावधीचा एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्ती
द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर
त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे
अधिकार निवड समितीला राहतील.
5) एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त
मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र
करून देणे बंधनकारक असेल.
6) पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर
परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने
अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा.परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS
World University Rank) 200 च्या आत असावी.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत भाग 1, चौथा मजला, आरसी मार्ग, चेंबूर मुंबई 71 येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.