श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना शोक – महासंवाद
मुंबई दि. 24 :ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक पद्मभूषण श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
देशातील निवडक विचारवंत चित्रपट निर्मात्यांच्या यादीत श्री. श्याम बेनेगल यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. समांतर चित्रपटातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाद्वारे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली अमीट छाप सोडली.
अंकुर, निशांत आणि मंथन यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक वास्तवाचे चित्रण मांडण्याचे धैर्य दाखवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रतिभावंत कलाकार जगासमोर आले. ‘भारत एक खोज’ या ऐतिहासिक दूरदर्शन मालिकेच्या माध्यमातून त्यांनी लाखो प्रेक्षकांना भारताच्या गौरवशाली इतिहासाची नव्याने ओळख करून दिली.
त्यांच्या निधनामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांना प्रेरणादायक असणारा एक प्रतिभावंत निर्माता – दिग्दर्शक गमावला आहे. मी दिवंगत श्री श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना आपल्या शोक संवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.