डॉ.सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली, 18: मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्क पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.
अकादमीचे सचिव, के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2024 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 21 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली.
डॉ.सुधीर रसाळ यांच्याविषयी…
डॉ.सुधीर रसाळ हे मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करणारे रसाळ हे औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे 1990 ते 1993 या काळात प्रमुख होते. साहित्य लेखन, समीक्षा आणि संपादन या क्षेत्रांत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
ग्रंथसंपदा
डॉ.रसाळ यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये कविता आणि प्रतिमा, कविता निरूपणे, मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण, ना.घ. देशपांडे यांची कविता यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांचे लेखन वाङ्मयीन जाणिवा, शैली, आणि संस्कृती यावर विशेष प्रकाश टाकते.
पुरस्कार आणि मानसन्मान
डॉ. रसाळ यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये अशोक कीर्तकीर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार, गौरवमूर्ती पुरस्कार, आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. 2021 साली त्यांना अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
“विंदांचे गद्यरुप” या पुस्तकाविषयी…
मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या ‘विंदाचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकाला प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात सैद्धांतिक समीक्षेचा अभाव अधोरेखित करणारे हे पुस्तक साहित्य आणि वाङ्मयविषयक अनेक प्रश्नांना समर्थ उत्तरे देते.
डॉ. सुधीर रसाळ यांनी त्यांच्या समीक्षेत वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा, तिच्या घटकांच्या परस्पर संबंधाचा आणि तिच्या मूल्यमापनासाठी योग्य निकष तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी समीक्षेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात काही निवडक समीक्षकांनीच अशा प्रकारचे सैद्धांतिक अभ्यास सादर केले आहेत. बा.सी मर्ढेकरांनी यांनी सर्व ललित कलांबाबत सिद्धांत मांडला, त्यानंतर विंदा करंदीकर यांनी वाङ्मयकलेच्या जीवनाविधी कलेवर आधारित वेगळा सिद्धांत मांडला.
परंतु करंदीकरांच्या या सिद्धांताला अपेक्षित मान्यता मिळाली नाही. त्यांच्या समीक्षेत केवळ सिद्धांत नव्हे, तर समग्र काव्यशास्त्र निर्माण करण्याची क्षमता होती. डॉ.रसाळ यांनी या पुस्तकातून पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैध्दांतिक समीक्षा मांडली आहे.
परीक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी
श्री हरिश्चंद्र थोरट, श्री. वसंत आबाजी डहाके आणि डॉ. विद्या देवधर या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परीक्षक मंडळात समावेश होता. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा 8 मार्च 2025 रोजी कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित केल्याची माहिती, सचिव श्री के. श्रीनिवासराव यांनी दिली.