भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू
मुंबई दि.१८: भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता दि.23 डिसेंबर, 2024 ते 11 जानेवारी, 2025 या कालावधीत प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात करावे, असे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ग. ल. तरतरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. अर्ज करण्यासाठी www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://doaonline.Co.in/LDMIC/ या लिंकवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
संगीत महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांची गुणवत्ता व उपयुक्तता उत्कृष्ट दर्जाची राखण्यासाठी सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या सल्लागार मंडळावरती अध्यक्ष म्हणून उषा मंगेशकर, सदस्य म्हणून सुरेश वाडकर, आदिनाथ मंगेशकर तर मयुरेश पै समन्वयक म्हणून आणि कला संचालनालयाचे संचालक संतोष क्षीरसागर सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
महाविद्यालयात शिकवण्यात येणारे अभ्यासक्रम
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, पियानो/कीबोर्ड प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच संगीत निर्मिती व ध्वनी अभियांत्रिकी प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी 25 प्रवेश क्षमता आहे.अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष असून वार्षिक शुल्क 5400 रुपये इतके आहे. तसेच सलिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिने कालावधीसाठी शनिवार – रविवार या दिवशी भावसंगीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे या अभ्यासक्रमासाठी 50 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून वीस हजार रुपये प्रवेश शुल्क असणार आहे.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम तात्पुरत्या स्वरूपात पु. ल. देशपांडे अकादमी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी मुंबई येथे फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात येतील. प्रवेश प्रक्रिया तसेच ऑडिशन बाबत पुढील माहिती www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याने उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळाला भेट द्यावी असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
०००