शेतकऱ्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत प्राधान्याने पोहाेचण्यासाठी प्रयत्न करा – ॲड. निलेश हेलोंडे पाटील
नांदेड दि. 12 डिसेंबर :- शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आहे. तो जगलाच पाहिजे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहाेचण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करा. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपलं कुटुंब समजून त्यांच्यापर्यंत जाऊन आवश्यक मदत करून त्यांना आधार द्या, असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपवनसंरक्षक केशव वाबळे, उपजिल्हाधिकारी रोहयो ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डी. एस. इंगळे, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, रेशीम विकास अधिकारी पि. बी. नरवाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा आरोग्य अधिकारी संगिता देशमुख, यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. या आत्महत्येत तरुण शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाठी सर्वांनी मिळवून प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे नैराश्य कमी करून त्यांच्या आत्महत्या आपल्याला रोखता येतात. यासाठी ग्रामीण भागात पोवाडा, नाटक, किर्तनासारख्या अनेक उपक्रम राबविले पाहिजेत. सामाजिक बांधिलकीतून संतगाडगेबाबांनी केलेल्या कार्याची आठवण ॲड निलेश हेलोंडे पाटील यांनी यावेळी करून दिली.
शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मराठवाड्यात चारा लागवडीबाबत वाढ होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात प्रयत्न करून मोफत चारा वाटपाचा उपक्रम हाती घ्यावा. जैविक नैसर्गिक खते निर्माण करण्याची प्रयोगशाळा सुरू झाल्यास शेतकऱ्यांचा होणारा उत्पादन खर्च कमी होईल. यासाठी शेतीच्या बांधावर जाऊन त्याचे प्रयोजन करावे. सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांचा यात मोठा सहभाग वाढवावा, अशी सूचना त्यांनी केली.पिक विमा उतरवितांना शेतकऱ्यांना मदत लागते. यासाठी पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचे नाव, संपर्क क्रमांक प्रत्येक गावात दर्शनी भागात प्रसिद्ध केली पाहिजेत, असे सांगून त्यांनी हदगाव तालुक्यातील एका प्रतिनिधींला संपर्क होतो का याची प्रत्यक्ष तपासणी केली व माहिती घेतली.
शेतमालाचे किमान आधारभूत मूल्य कृषि उत्पन्न बाजार समितीत दर्शनी भागावर दिसणे आवश्यक आहे. यासाठी मोठे फलक करून लावावेत. शेतमाल तारण योजनेचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ही योजना चांगली असून यातून शेतकऱ्यांना मोठी मदत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन सोयाबीन केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनाही त्या समजल्या पाहिजेत यासाठी विविध माध्यमाचा उपयोग करून त्यांच्या पर्यंत त्या योजना गेल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची सोय, स्पर्धा परीक्षा वाचनालय व शाळेत पटांगणाची सुविधा असणे आवश्यक आहे. शाळेच्या मैदानी खेळातून लहान मुलांचा शारीरिक विकास चांगला होतो. क्रीडा कार्यालयाच्या विविध योजनेतून ग्रामीण शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अनेक उपक्रम राबवावेत.आपल्याला निसर्गावर प्रेम करता आले पाहिजे. निसर्ग समजल्याशिवाय निसर्ग वाचवता येत नाही. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करून टेलीस्कोप उपकरणाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना पुरक यंत्रसामुग्री वाटपासाठी प्रयत्न करून शेतकरी कुटुंबाला मदत करावी. क्याकटसच्या उत्पादनाचा खर्च कमी येतो, पाणी कमी लागते यासह विविध फळ प्रक्रियेवर भर देवून कृषि विभागाने कौशल्य विकास विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने तरुणाला रोजगार उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या रोजगार मेळाव्याची त्यांनी माहिती घेतली.
बँकांनी खरीप हंगामात कर्ज वाटपातून शेतकऱ्यांना मदत करावी असे सांगून वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांचे नुकसान व मोबदला अनुदान वाटपाची माहिती त्यांनी घेतली. जनावरांना धोका होऊ नये म्हणून शेतकरी रात्री थंडीत जनावरांची काळजी घेतो. जंगलात फळांची झाडे लावल्यास वन्यप्राणी गावात येणार नाहीत. त्यासाठी जंगलातील फळझाडांचे अधिक प्रमाण वाढवावे. वनविभागाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात त्या शेतकऱ्यांना माहिती करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
शेतकऱ्यांसाठी दामिनी ॲप
विज पडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह जनावरांचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दामिनी ॲप वापरावा. या ॲपमुळे 4 तास आगोदरच विज पडणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे पशुधनाचे व शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. यासाठी शेतकऱ्यांने जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.
कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत ग्रामस्तरावर सविस्तर पुस्तक स्वरुपात पोहचल्या पाहिजेत. यासाठी कृषि विषयक विविध योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. नांदेड जिल्हा रेशीम क्षेत्रात आघाडीवर असून शेतकरी पारंपारिक पिकासोबतच हळद, केळी, स्ट्रॉबेरी फळ घेण्याकडे कल वाढवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. विषय सुचीनुसार सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम व योजनांची माहिती दिली. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आभार मानले.
0000