विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १२ : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, ‘डी. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावली आहेच. त्याचबरोबर आपल्या देशाचा बुद्धिबळाच्या क्षेत्रातील दबदबा आणखी वाढला आहे. विश्वनाथन आनंदच्या कामगिरीमुळे देशातील मुलांना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली. आता याच कामगिरीची परंपरा गुकेश समर्थपणे पुढे नेईल’, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
000