जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जागतिक एड्स दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ०२ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर आधारित प्रदर्शन स्टॉल, लोककलापथक सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींचे मनोगत तसेच जिल्हास्तरावर काम करणाऱ्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांचा सत्कार इ. कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
जागतिक एड्स दिन दरवर्षी ०१ डिसेंबर रोजी पाळला जातो. हा दिवस एड्सबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि एड्समुळे मृत पावलेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी समर्पित आहे. यावर्षी सन २०२४ ची जागतिक एड्स दिनाची संकल्पना टेक द राईटस् पाथ ही आहे. ही संकल्पना एचआयव्ही/एड्स संसर्गाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तसेच मानवी हक्कांचे समर्थन करण्याच्या महत्वावर भर देते.
या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव-२ नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, संचालक आरोग्य सेवा, मुंबई डॉ. स्वप्निल लाळे, संचालक आरोग्य सेवा, पुणे डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था डॉ. विजय कंदेवाड, सिनेकलाकार संजय नार्वेकर, श्रीमती कल्याणी मुळे उपस्थित राहणार आहेत.
००००