धुळे जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर – महासंवाद

0 4

धुळे जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर – महासंवाद

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

धुळे, दि. 16 नोव्हेंबर : जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा व आपले कर्तव्य पार पाडून लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बोरविहीर येथील मतदार जनजागृती कार्यक्रमात केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज बोरविहीर, ता. जि.धुळे येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, तहसिलदार अरुण शेवाळे, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, गटशिक्षणधिकारी विठ्ठल घुगे, विस्तार अधिकारी श्री.महंत, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे, प्राचार्य प्रकाश सोनवणे, सरपंच स्मिता ठाकरे, ग्रामसेवक आबासाहेब पवार, पोलीस पाटील वाल्मीक सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, नागरीक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.पापळकर म्हणाले की, धुळे जिल्ह्यात अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांमध्ये नागरीकांचा सहभाग महत्वाचा आहे. मतदान हे आपल्याला लोकशाहीने दिलेला मुलभूत अधिकार असल्याने प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. मतदानापासून कुणीही वंचित राहू नये याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासन सर्व सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. या सुविधांचा मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी अंगणवाडी सेविका, आशासेविका, शिक्षक, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सामाजिक संस्था यांनी मतदारांना प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. मतदारांनीही येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपले कितीही महत्वाचे काम असले तरी मतदानासाठी किमान एक तास वेळ काढून आपला हक्क बजवावा.

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील 40 टक्के मतदार हे मतदान करत नाही. बोरविहीर गावात लोकसभेला चांगले मतदान झाले. त्याचप्रमाणे येत्या विधानसभेलाही मतदान करावे. एक एक मताचे महत्त्व ओळखून दर पाच वर्षांनी येणारी ही अनमोल संधी न गमवता जे नागरिक कामानिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेरगावी गेले असतील त्यांनाही येत्या 20 तारखेला बोलावून मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.

उपविभागीय अधिकारी रोहन कुवर म्हणाले की, आपल्या पुढील उज्जवल भविष्यासाठी मतदानाचा मुल्यवान अधिकार भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना दिला आहे. राज्याचा तसेच गावाचा विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देण्याची हीच संधी असून ही संधी पाच वर्षांनी प्राप्त होत असल्याने सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी गावातून विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच सहकार महर्षी पि.रा. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चौका चौकात पथनाट्य सादर केले. यावेळी धुळे तालुक्यातील शिक्षकांनी तयार केलेले अहिराणी भाषेतील कलापथकाने मतदार जनजागृतील नाटीका सादर करून उपस्थितांमध्ये जनजागृती केले. यावेळी रांगोळी स्पर्धा, सेल्फी पॉईंट, स्वाक्षरी मोहीम, मतदानाची शपथ आदि जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार महर्षी पी. रा. पाटील हायस्कूल, बोरविहिर, जिल्हा परिषद शाळा,  ग्रामपंचायत, बोरविहिर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डी. एम. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे प्राचार्य पी. बी सोनवणे यांनी केले.

000000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.