कुलाबा विधानसभा मतदारसंघातील नेव्ही नगर येथे भारतीय नौदलातील नौसैनिकांसाठी मतदार जागरूकता अभियान – महासंवाद
मुंबई, दि. १५ : कुलाबा मतदारसंघातील नेव्ही नगर परिसरातील रहिवासी व नोंदणी केलेल्या भारतीय नौदलात कार्यरत नौसैनिक मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने आवर्जून मतदान करून लोकशाहीतील राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुलाबा विधानसभा मतदारसंघातील नेव्ही नगरमधील रहिवासी नौसैनिकांसाठी नेव्ही चिल्ड्रेन स्कूलमधील संवाद सभागृहात मतदार जागरूकता अभियानानिमित्त आज मतदार जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री. यादव बोलत होते. नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने ‘सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टीसिपेशन (स्वीप) हे अभियान राबविण्यात येत आहे.
यावेळी श्री. यादव म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी बघता कुलाबा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी कमी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नेव्ही नगर परिसरातील रहिवासी व नोंदणी केलेल्या भारतीय नौदलात कार्यरत नौसैनिक मतदारांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी जास्तीत जास्त संख्येने आवर्जून मतदान करून मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याबाबत दक्षता घ्यावी. मतदारयादी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांकडे दिली जाणार असून मतदारयादीत नाव असलेल्या मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबतचे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे व नौदलातर्फे केले जाणार असल्याचे श्री. यादव म्हणाले. ज्या मतदारांचे मतदारयादीत नाव नसेल त्यांचे नाव नोंदवून घेण्यासाठी तसेच स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही श्री. यादव यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या.
भारतीय नौदलाचे स्टेशन कमांडर व आयएनएस आंग्रेचे कमांडिंग अधिकारी ऋषिराज कोहली म्हणाले की, मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून जशी आपण नौदलात शपथ घेऊन कर्तव्य बजावतो त्याचप्रमाणे मतदान करण्याची शपथ घेऊन नौसैनिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे. विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची माहिती नौदलात कार्यरत सर्व विभागातील कर्मचारी यांच्यापर्यन्त पोहोचण्याचे आवाहन श्री. कोहली यांनी केले.
मुंबई शहरचे ‘स्वीप’ विभागाचे समन्वय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा, मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. लोकशाहीला खर्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा अभियानाचा मूळ उद्देश असल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी सभागृहातील उपस्थितांना मताधिकार बजावण्याची शपथही देण्यात आली.
यावेळी कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महादेव किरवले, नेव्ही नगरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कॅप्टन ज्योतिर्मय रवी, पंकज कुमार आदींसह भारतीय नौदलात कार्यरत नौसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००