मतदान वाढविण्याच्या प्रक्रियेत सर्व विभागांचा सहभाग आवश्यक – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम – महासंवाद
मुंबई, दि. 5 : विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विभागांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या जनजागृतीच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले.
श्री.चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप, माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सह धर्मादाय आयुक्त महेश लंबे, उद्योग विभागाचे सह सचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, महिला व बालविकास विभागाचे उपसचिव आनंद भोंडवे, ऊर्जा विभागाचे अवर सचिव नितीन सुर्वे, सह मुख्य निवडणूक अधिकारी के. सूर्यकृष्णमूर्ती, उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यावेळी उपस्थित होते.
मतदारजागृतीसाठी येत्या आठ तारखेपासून मतदानाच्या दिवसापर्यंत विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये सर्व विभागांनी सहभागी व्हावे, अशी सूचना श्री.चोक्कलिंगम यांनी केली. राज्यातील कामगारांची मोठी संख्या लक्षात घेता उद्योग विभागाने मतदानासाठी एक दिवसाची सुटी जाहीर केली आहे, तथापि जेथे शक्य नसेल तेथे दोन तासांऐवजी किमान अर्धा दिवस सुटी देण्याचे निर्देश संबंधित आस्थापनांना द्यावेत, मोठ्या उद्योजकांना मतदार जागृतीबाबत आवाहन करण्यास प्रवृत्त करावे, महिला व बालविकास तसेच ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील बचत गटांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात यावे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका, गावपातळीवरील तलाठी आदींच्या माध्यमातून घराघरात मतदानाचा संदेश पोहोचविण्यात यावा, सामाजिक न्याय तसेच शिक्षण विभागाच्या अधिनस्त संस्थांमधील 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना तसेच त्याखालील वयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात यावे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत संस्थांना देखील त्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशा सूचना श्री.चोक्कलिंगम यांनी यावेळी केल्या.
प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी मतदार जागृतीसंदर्भात महासंचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संदेश रेकॉर्ड करून समाजमाध्यमांवरून प्रसारित करण्यात येत असून यासाठी विशेष हॅशटॅग वापरण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त समाजात प्रभाव असणाऱ्या विविध व्यक्तींचे संदेश रेकॉर्डिंग केले जात आहे. होर्डिंग्ज, डिजिटल माध्यमे, सार्वजनिक परिवहनाची साधने आदींच्या माध्यमातून देखील मतदार जागृतीचे कार्य केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र स्थापित करण्यात येत असून मतदान वाढीसाठी याचा चांगला परिणाम दिसून येत असल्याचे सांगून मुंबई शहरातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करावेत आणि येथील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.
0000