परभणीत महिला मतदारांसाठी गेम शोच्या माध्यमातून मतदान जनजागृती – महासंवाद

0 1

परभणीत महिला मतदारांसाठी गेम शोच्या माध्यमातून मतदान जनजागृती – महासंवाद

परभणी, दि. २५ : जिल्हा निवडणूक विभाग आणि विश्वमांगल्य यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी परभणीतील महिला मतदार वैशाली पोटेकर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी गुरुवारी (दि.24)  रामकृष्णनगर येथे गेम शो पार पडला.

परभणी जिल्हा मतदान जनजागृती कक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुमारे 350 महिला मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. याप्रसंगी जिल्हा निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते आणि  जिल्हा मतदान जनजागृती कक्षाचे नोडल अधिकारी  गणेश शिंदे  यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मतदान जनजागृती कक्षाच्या स्वीप टीमच्या सदस्यांनी मतदान जनजागृतीसाठी संगीत आणि नाट्य आधारित प्रभावी सादरीकरण केले.

जिल्हा निवडणूक विभागामार्फत स्वीप अंतर्गत मतदार जागृतीचे विविध कार्यक्रम घेतले जातात. तथापि, एका जागरुक महिला मतदाराने असा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करून तो यशस्वी केल्याबद्दल वैशाली पोटेकर यांचे कौतुक करून जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी यांनी उपस्थित महिला मतदारांना मतदानाचे आवाहन केले. स्वीप विभागाचे नोडल अधिकारी गणेश शिंदे यांनी त्यांच्या कक्षाच्या कामात या कार्यक्रमामुळे मदत झाल्याचे सांगून नाविन्य पूर्ण संकल्पनेबाबत वैशाली पोटेकर यांचे आभार व्यक्त केले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सदर संकल्पनेची प्रशंसा करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

संगीता क्षीरसागर यांच्या तर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून गेमशोमधील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. निवेदक आणि स्वीप टीमचे सदस्य प्रवीण वायकोस यांच्या खुमासदार सुत्रसंचलनातून सुमारे दोन तास उपस्थित महिलांना मनोरंजनासोबत मतदानाबाबत जागरुकता या कार्यक्रमाद्वारे करण्यात आली.

स्वीप टीमचे  गणराज येरमळ,  प्रवीण वायकोस, अरविंद शहाणे, प्रफुल्ल शहाणे, मोहन आल्हाट, त्र्यंबक वडसकर, रामप्रसाद अवचार, वैभव पुजारी, श्री लोणारकर,  भगवान काळे, अतुल सामाले, ज्ञानेश्वर पाथरकर, बबन आव्हाड, संजय पेडगावकर,  लक्ष्मण गारकर, महेश देशमुख, शिवाजी कांबळे, श्री. चव्हाण, हनुमंत हंबीर आणि सुधाकर गायकवाड यांनी मतदान जनजागृतीचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

कार्यक्रमात स्वीप कक्षाच्यावतीने विविध बॅनर्स आणि सेल्फी पॉइंट लावण्यात आले होते. स्वीप टीमच्या कलाकारांनी संगीत आणि नाट्य प्रकाराद्वारे उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन केले. गेम शोच्या माध्यमातून पैठणी कार्यक्रमाच्या धर्तीवर प्रश्नावली आणि खेळ याद्वारे हसत खेळत आणि बक्षीसांची लयलूट करत मतदान जनजागृतीचा संदेश देण्यात आला. महिलांचा मतदानाबाबतचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची आखणी केली असल्याची माहिती वैशाली पोटेकर यांनी दिली. जिल्हा निवडणूक विभाग आणि स्वीप टीम यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे, असे सांगून त्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले. उपस्थित सर्वच महिलांनी मतदान करण्याचा यावेळी संकल्प केला.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.