स्पर्धा परीक्षार्थी, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शहरात अत्याधुनिक अभ्यासिका उभारणार – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि. 8 : शहरी व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या ठिकाणी अत्याधुनिक अभ्यासिका उभारणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
दारव्हा शहरातील स्वामी समर्थ नगर, नातुवाडी येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्व बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका केंद्र व ग्रंथालयाचे लोकार्पण शनिवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मितकर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, श्रीधर मोहोड, कालिंदा पवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रवी वाकोडे, दीपक कोठारी, मनोज सिंगी, राजू दुधे, आरिफ काझी, दामोदर लढ्ढा, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, सुभाष राठोड, सुशांत इंगोले यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, समाजामधील शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित झाल्या पाहिजेत, ही सातत्याने भूमिका राहते. लोकप्रतिनिधी म्हणून फक्त रस्ते, नाल्या, सभामंडप अशा मूलभूत सुविधांसारखे सार्वजनिक विकासकामे नेहमी करत असतो. समाजाच्या विकासासाठी नव्या संकल्पना राबविण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. या संकल्पनेतूनच दारव्हा शहरात नवे अभ्यासिका केंद्र उभे राहिले आहे. त्यात सर्व सोयीसुविधा व स्वच्छता आहे. परंतु त्या कायम राहिल्या पाहिजेत. तसेच संगणक आणि स्पर्धा परीक्षा पुस्तकांची संख्या वाढवावी लागेल. विद्यार्थ्यांना ही अभ्यासिका उपलब्ध झाली असून अजून एक अभ्यासिका करणार आहोत. त्याच्या बांधकाम आणि इतर सुविधांसाठी 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत. अशा अभ्यासिका जिल्ह्यातील प्रत्येक शहराच्या ठिकाणी झाल्या पाहिजेत या भूमिकेतून खनिज विकास निधीतून प्रत्येक शहराला 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
पैसे, साधन आणि सर्व सुविधा असलेले विद्यार्थी पुणे, नागपूर सारख्या शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जाऊ शकतात. परंतू समाजातील अनेक कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी त्यापासून वंचित राहतात. त्यासाठी गाव तिथे अभ्यासिका झाली पाहिजे या भूमिकेतून अभ्यासिकेसाठी गावातील शाळा, ग्रामपंचायतीत स्पर्धा परीक्षेची पुस्तके, फर्निचर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निधीची भरीव तरतूद केलेली आहे. याचा पहिला टप्पा मंजूर केला असून जिल्हाभरात कामाला सुरुवात झाली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सर्व शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजे या भूमिकेतून मॉडेल स्कुलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्यासाठी भरीव निधी मंजूर करून घेतला आहे. लवकरच प्रायोगिक तत्वावर काम सुरू होणार आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय, योजनांची माहिती देत त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केले.
जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देणारे प्रकल्प, महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना, साखर कारखाना आणि व्ही तारा कंपनीच्या उद्योग प्रकल्पाची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
दारव्हा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी 150 कोटींचा डीपीआर
दारव्हा शहराचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलण्याचे काम चालू आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या मार्फत दीडशे कोटींचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. दारव्हा शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेवर काम सुरू आहे. महिन्याभरात पाणी पोहोचवण्याचे नियोजन केले असल्याचे सांगून दारव्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मितकर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी रवी वाकोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दहावी व बारावीतील ३०८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले व पदवी, पदविका अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गुंठेवारी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
000