संपूर्ण स्वच्छता मोहीम ही फक्त मोहीम नसून लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 7: स्वच्छता ही प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत आहे. यासाठी विद्यार्थी, प्रशासकीय यंत्रणा, सहकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे. ही फक्त एक मोहीम नसून हे जनतेचं अभियान आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच स्वच्छतेचे हे अभियान लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहिमेला नेपियन सी रोड, प्रियदर्शनी पार्क येथून सुरुवात होऊन नरिमन पॉईंट, एनसीपीए, कर्नक बंदर या ठिकाणी ही मोहिम राबवून शिवडी-न्हावा शेवा (एमटीएचएल), कोस्टल रोड या प्रकल्पांच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सुधाकर शिंदे, कोस्टल रोडचे मुख्य अभियंता श्री. स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विकसित भारत अभियान ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. स्वच्छ भारत अभियान हे 2015 ला सुरु करण्यात आले. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन हे अभियान राबविण्यास सुरूवात केली. तेव्हा खऱ्या अर्थाने या अभियानाला चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून नागरिक येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सिडको, एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या मोहिमेला शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, सफाई कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणांसह नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत.
संपूर्ण स्वच्छता मोहीम संपूर्ण राज्यात
मुंबई महानगर (एमएमआर) क्षेत्रात मीराभाईंदर, भिवंडी पनवेल, ठाणे, डोंविबवली, कल्याण या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. हळुहळू आपल्याला ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवायची आहे. यासाठी अद्ययावत अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत असून मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी संपूर्ण स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. आज ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे, त्याठिकाणी नेमून दिलेल्या यंत्रणेने तीन किलो मीटरपर्यंतचे आपले काम पूर्ण करावे तसेच सकाळी मॉर्निग वॉकसाठी येणाऱ्या लोकांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये, यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी सकाळी लवकर येऊन स्वच्छता केली पाहिजे, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या आहेत.
स्वच्छता कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी संवाद साधून त्यांच्या आडचणी आहेत त्या सोडविण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांना पंचतारांकित सुविधा देण्यात येत आहेत. स्वच्छतेच्या मोहिमेत खरे हिरो हे सफाई कर्मचारी असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
शिवडी- न्हावा शेवा (एमटीएचएल) आणि कोस्टल रोड हे गेम चेन्जर प्रकल्प
अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू (एमटीएचएल) हा समुद्रावरील देशातील सर्वाधिक लांबीचा असा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दळणवळणासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. हा पर्यावरणपूरक असा प्रकल्प आहे. हा पूल बांधण्यासाठी चांगल्या दर्जाचे साधन सामग्री वापरण्यात आले आहे. याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. याचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या मार्गावरील टोलची सुविधाही अत्यंत माफक दरात म्हणजेच 250 रुपयात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई गोवा, पुणे, नवी मुंबईशी कन्क्टेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे नवी मुंबई एरपोर्टलाही जोडले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करताना ध्वनिप्रदूषण होणार नाही तसेच फ्लेमिंगोचे जीवन, खारफुटीला धोका होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक साधनसामग्रीचा वापर करून या प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील होणारी वाहतूक कोंडी सुटणार, प्रदूषण कमी होणार आहे तसेच वेळ व इंधनाची पर्यायाने आर्थिक बचत होण्यास मदत होणार आहे.
प्रदूषणात घट
शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर असे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे मुंबई शहरातील हवेतील प्रदुषणाचा इन्डेक्स 350 होता तो आता 100 वर आला ही चांगली बाब आहे. यामुळे पवईमध्ये 80 बोरीवली 90 असे प्रमाण झाले आहे. बांद्रा, बीकेसी आणि ठाणे अशा ठिकाणी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रेरणा
आज सकाळी मुंबईतील विविध ठिकाणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मॉर्निंगवॉक करणाऱ्या नागरिकांशी स्वच्छता अभियानाविषयी संवाद साधला. तसेच मुख्यमंत्र्यांनी रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी मार्ग, भिंती पाण्याने साफ केल्या. स्वच्छता करताना पाण्यातून वाहून जाणारी माती, कचऱ्याची साफसफाई स्वच्छता कर्मचारी करीत होते. हातात पाण्याचा पाईप व झाडू घेऊन स्वत: मुख्यमंत्री स्वच्छता करीत असल्याचे पाहून अधिकारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रेरणा मिळत होती.