आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची; ही मोहीम अखंडितपणे सुरु ठेवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६: स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी महास्वच्छता अभियानाला देखील प्रारंभ झाला आहे. शहरांमधील सर्वंकष स्वच्छतेवर भर देण्यासाठी यंत्रणा अहोरात्र काम करत असून ही स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी मागील ३ डिसेंबरपासून शहरात ‘संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग)’ मोहीम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. सलग पाच आठवड्यांपासून मुख्यमंत्री श्री. शिंदे हे स्वत: सुट्टीच्या दिवशी पहाटेपासून स्वच्छता मोहिमेत (डीप क्लिनिंग) सहभागी होवून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवित आहेत.
आज कुलाबा येथील आयएनएस शिक्रा येथून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. याठिकाणी कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मनपाचे आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त संजोग कबरे, डॉ. संगीता हसनाळे, उल्हास महाले, प्रमुख अभियंता मनिशकुमार पटेल आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद
मुख्यमंत्र्यांनी आयएनएस शिक्रा परिसरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधून रस्त्यावर माती, कचरा राहणार नाही, साचलेल्या कचऱ्याचे विलगीकरण याविषयी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. शिवाय येथील मुंबई पब्लिक स्कूल, कुलाबा इंग्लिशचे विद्यार्थी, शिक्षक यांनाही स्वच्छता अभियानविषयी माहिती देत मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले.
डीप क्लिनिंग ही मोहीम मुंबईपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर करण्यात आली आहे. राज्यातही मोठ्या शहरात स्वच्छता मोहीम नियमित सुरू असल्याने हवेतील प्रदूषण कमी राहाण्यास मदत होणार आहे. यामुळे स्वच्छता करणाऱ्या खऱ्या हिरोंकडे शासनाचे लक्ष राहील, त्यांच्या समस्या, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
पूर्व मुक्त मार्गाच्या (फ्री वे) सुरूवातीला आणि या मार्गावरील वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीजवळ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याठिकाणीही मुख्यमंत्र्यांनी रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी मार्ग, भिंती पाण्याने साफ केल्या. स्वच्छता करताना पाण्यातून वाहून जाणारी माती, कचऱ्याची साफसफाई स्वच्छता कर्मचारी करीत होते. कधी हातात पाण्याचा पाईप तर कधी झाडू घेवून स्वत: मुख्यमंत्री स्वच्छता करीत असल्याचे पाहून अधिकारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रेरणा मिळत होती.
माध्यम प्रतिनिधींना दिल्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा 6 जानेवारी हा जन्मदिवस, हा पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकार, कॅमेरामन यांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पूर्व द्रूतगती मार्गावरील वाहतूक पोलीस चौकीजवळही मुख्यमंत्री श्री. शिंदे, मंत्री श्री. लोढा यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आमदार यामिनी जाधव यांच्यासह मनपाचे अधिकारी सामील झाले होते.
०००