विकसित भारत संकल्प यात्रा लोकसहभागाचे प्रतिक – प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा

0 6

मुबंई, दि. ४ : भारताला २०४७ पर्यंत विकसित बलशाली देश बनवण्याचा संकल्प आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी केलेला असून त्या संकल्पाच्या यशस्व‍ितेसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग गरजेचा आहे. त्या पार्श्वभूमीवर  विकसित भारत यात्रा सुरु झाली आणि देशातील नऊ कोटी लोकांनी यामध्ये सहभाग घेतला असल्याने ही यात्रा लोकसहभागाचे प्रतिक बनली असल्याचे प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पी.के.मिश्रा यांनी येथे सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते ‘पी’ उत्तर विभाग मालाडच्या वतीने गोरेगाव (पूर्व) येथील स्व.मीनाताई ठाकरे क्रीडांगण नागरी निवारा परिषद येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात श्री. मिश्रा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आ‌मदार विद्या ठाकूर, आमदार राजहंस  सिंह, आमदार अमित साटम, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल उपस्थित होते. यावेळी श्री. मिश्रा यांनी विविध दालनांना भेट देऊन नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल माहिती घेतली.

             श्री. मिश्रा म्हणाले की, देशातील प्रत्येक घटकांपर्यंत विकासाच्या संधी पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून जनतेला आत्मनिर्भर चांगले आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यांची जनजागृती करुन त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येत आहेत. आपल्यालाही योजनांचा लाभ मिळणार आहे हा विश्वास जनेतमध्ये निर्माण करण्याचा उद्देश या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून यशस्वी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः या यात्रेत आतापर्यंत आठ वेळेस सहभागी झाले आहेत. प्रधानमंत्री महोदयांचा विचार आहे की देशाच्या विकास यात्रेत प्रत्येक व्यक्ती सहभागी व्हावा. आपण विकसित होऊ शकतो, होत आहोत, हा विश्वास लोकांमध्ये निर्माण व्हावा यासाठी ही यात्रा सुरु करण्यात आली आहे.

लोकसहभागाचे प्रतिक बनलेल्या या यात्रेत आतापर्यंत देशातील ९ कोटी लोकांनी सहभाग घेतला असून आतापर्यंत ही यात्रा दीड लाखांहून जास्त पंचायती आणि शहरात पोहोचली आहे. लोकसहभागातून नेहमीच आपण उल्लेखनीय यश संपादन केले आहे, हे स्वच्छ भारत अभियान, हर घर तिरंगा अभियान तसेच कोविड सारख्या संकटाचा सामना यातून दाखवून दिले आहे. सामान्य माणसाच्या जगण्यात होणारा चांगला बदल विश्वासवर्धक असतो. जो दुसऱ्यांना विकासाची हमी देणारा ठरतो. आतापर्यंत ग्रामीण भागात प्रामुख्याने विकसित यात्रा करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. आता शहरी समस्यांवर लक्ष केंद्रीत करुन त्यावर या यात्रेच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. शहरातील मध्यम वर्गीय, गरीब, स्थलांतरीत या सर्वांच्या चांगल्या जीवनमानासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मुद्रा योजना, पीएम स्वनिधी, स्वनिधी से समद्धी योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्वला भारत योजना, यासारख्या विविध योजनांचा लाभ मोठ्या संख्यने लाभार्थ्यांना मिळत असून त्याच्या सहाय्याने विविध घटकांना प्रगतीची संधी प्राप्त होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नागरिकांच्या आरोग्याला विशेष प्राधान्य देण्यात येत असून या यात्रेदरम्यान आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. या यात्रेत देशातील दोन कोटी लोकांना आयुष्मान भारत कार्ड वितरीत करण्यात आले आहे. स्टेट बॅंकेच्या वतीने सीएसआरच्या माध्यमातून शिलाई मशीन्सचे वाटप करण्यात आले आहे. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत देशात पन्नास लाख पेक्षा जास्त फेरीवाल्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या यात्रेदरम्यान शहरी भागातील जनतेसाठी स्वनिधी योजनेतंर्गत विशेष शिबिर लावण्यात येत आहे, ज्याच्या माध्यमातून लाखो लाभार्थ्यांनी अर्ज केले आहे. ही सर्व आकडेवारी संकल्प यात्रेच्या यशाला अधोरेखित करते. तसेच या यात्रेत देशातली युवापिढी मोठ्या संख्येने जोडली जात असून माय भारत स्वयंसेवकांच्या माध्यमातून नोंदणी करत आहेत. भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प आपण केला आहे. आपल्या सर्वांच्या सहभागाने हा संकल्प आपण यशस्वी करु, असा विश्वास श्री.मिश्रा यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातही या यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत होत असून मुंबईमधील कार्यक्रमाचे ही यशस्वी आयोजन केल्याबद्दल श्री.मिश्रा यांनी पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधी, मनपा आयुक्त व सर्व संबंधित यंत्रणांचे अभिनंदन यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्याने आपण सर्वांची जबाबदारी वाढली आहे. सर्वांच्या सहभागातून ही  यात्रा यशस्वी करु असा विश्वास मुंबई आणि महाराष्ट्राच्या वतीने व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी चित्रफीतीद्वारा प्रधानमंत्री यांचा संदेश  दाखविण्यात आला. तसेच सामूहिक स्वरूपात विकसित भारत संकल्प यात्रा प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.

महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक प्राची जांभेकर यांनी  प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या सोबत हमारा संकल्प विकसित भारत प्रतिज्ञा सामूहिक स्वरूपात घेण्यात आली. योजनांमुळे झालेल्या लाभाबाबत लाभार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले अनुभव सांगितले. साई किन्नर बचतगटाच्या सदस्यांसह इतर महिला बचतगटांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र तसेच विविध योजनांतर्गत अर्थसहाय्य मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले.

मुंबई मध्ये २३० ठिकाणी विकसित यात्रा उपक्रम झाले आहेत. ७० हजारांहून अधिक लोकांना लाभ देण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्याचप्रमाणे बॅकिंग, आयुष्मान भारत कार्ड, पीएम स्वनिधी, स्वनिधी से समृद्धी योजना, पीएम उज्ज्वला भारत, आधार कार्ड अद्ययावतीकरण सुविधा यासोबतच महिला व बाल विकास, आरोग्य योजना यासह केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती देणारे दालन उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने  माहिती घेतली.

००००

वंदनाथोरात/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.