नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडून बैठका आणि आढावा
मुंबई, दि. १: नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहत बैठकांच्या माध्यमातून आढावा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, आरोग्य यासह विविध विभागांच्या फायलींवर स्वाक्षरी करून त्या हातावेगळ्या केल्या. यावेळी नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना नववर्षांच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.
सरकार सामान्यांच्या हितासाठी गतिमानपणे निर्णय घेतानाच त्याची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे नेहमी आपल्या कृतीतून ते दाखवतात. आज त्यांचे मंत्रालयात आगमन झाले. यानंतर त्यांनी त्यांच्या दालनात विविध विभागांच्या सचिवांची बैठक घेऊन आढावा घेतला. राज्यातील सामान्य नागरिकांसाठी राबवित असलेल्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे. राज्य शासन घेत असलेल्या निर्णयांची अमंलबजावणी प्रशासनाकडून केली जाते ती अधिकाधिक प्रभावीपणे केली जावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ठाणे येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री मंत्रालयाकडे रवाना झाले. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचे आगमन झाल्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयासह मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त मुख्य सचिव डॉ. करीर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील दौऱ्याबाबत आढावा घेतला. नाशिक येथे १२ जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांचा देखील थोडक्यात आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय सहायता निधी, आरोग्य विभाग यासह विविध विभागाच्या फायलींवर स्वाक्षरी करत नववर्षाचा प्रारंभ केला. सायंकाळी उशिरापर्यंत भेटीगाठी, नववर्ष शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम सुरूच होता.
००००